Dhule Crime | लग्न झाल्यावर पती-पत्नीमध्ये वाद होणे ही बाब सामान्य असली तरी, काही वेळा हे वाद टोकाला जातात आणि त्यातून काही धक्कादायक घटना घडतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे घडली आहे. पत्नीशी झालेल्या वादानंतर पतीने रागाच्या भरात उचललेल्या टोकाच्या पावलामुळे त्याच्यासह त्याच्या दोन चिमुकल्या मुलांचे आयुष्यही क्षणात उद्ध्वस्त झाले. पत्नीशी झालेल्या वादानंतर संतापलेल्या पतीने आपला राग पोटच्या गोळ्यांवर काढत त्यांना तापी नदीच्या पाण्यात फेकून दिले. दुर्दैवाने या दोन्ही मुलांचा जीव गेला. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. (Dhule Crime)
नदी पात्रात आढळले चिमुकल्यांचे मृतदेह:
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील भुईकोट किल्ल्याशेजारी अमरधाम समोर तापी नदीच्या पात्रात 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दोन चिमुकल्या भावंडांचे मृतदेह तरंगत असल्याचे गावकऱ्यांना आढळून आले. यापैकी मुलगा अवघ्या 5 वर्षांचा तर मुलगी 3 वर्षांची होती. ही दुर्दैवी घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच एकच खळबळ उडाली.
गावकऱ्यांनी तात्काळ नदी पात्राकडे धाव घेत, पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले आणि त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घरगुती वादातून घडला धक्कादायक प्रकार:
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. दोन्ही मुले थाळनेर येथील नायण कोळी यांची असल्याचे निष्पन्न झाले. घरगुती वादातूनच मुलांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही मुलांना नदीपात्रात फेकल्याचे तपासात उघड झाले. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर पतीने रागाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी त्या निर्दयी बापाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Dhule Crime)
पती-पत्नीच्या वादात चिमुकल्यांचा बळी:
या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. पती-पत्नीच्या वादात दोन निष्पाप चिमुकल्यांचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा घरगुती वादाचे गंभीर परिणाम अधोरेखित झाले आहेत. कौटुंबिक हिंसाचार आणि रागावर नियंत्रण न ठेवता आल्याने काय भीषण परिणाम होऊ शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Dhule Crime)
Title : Dhule Crime Father Throws Two Children into Tapi River After Dispute with Wife