बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हात जोडून सांगतो… द्वारकारनाथ संझगिरी यांची कोरोनाबद्दल काळजाचा थरकाप उडवणारी पोस्ट

ज्येष्ठ क्रीडा विश्लेषक द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या फेसबुक पेजवर कोरोनासंदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. सोशल मीडियात ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. आपल्या नात्यातील व्यक्तीला दिसून लागलेली कोरोनाची लक्षणं ते रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊन त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंतचा प्रवास संझगिरी यांनी या लेखात मांडला आहे. कोरोनाचं गांभीर्य लोकांना कळावं, त्यांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, हा या लेखामागचा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी लिहिलेला हा लेख अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारा आहे. इतरांना याविषयी गांभीर्य निर्माण व्हावं यासाठी लेख वाचून झाल्यावर शेअर करा…

दिवस अमावस्येचे आहेत आणि पौर्णिमा खूप दूर आहे. सध्या छोटी चंद्रकोरसुध्दा दिसत नाही. कृपया सांभाळून रहा. जगभर मानवाने विषाणूसमोर गुडघे टेकले आहेत. भारताने लोटांगण घालायला सुरू केलं आहे. परवा मी एक डोकं सुन्न करणारा अनुभव घेतला. इतर अनेक त्यातून गेले आहेत. त्यांच्याकडून जे मी आजवर फक्त ऐकलं होतं, ते मी स्वतः अनुभवल्यानंतर मात्र हादरलो.

दोन दिवसांपूर्वी आमच्या एका जवळच्या नात्यातल्या जेष्ठाला ताप आला. माझी सून म्हणाली,” बाबा, त्यांचा ताप उतरत नाहीये. काय करायचं?” आजच्या काळात ताप आला की मनात उभी राहणारी पहिली भीती करोना हीच असते. मी माझ्या डॉक्टर मित्राला फोन केला. तो माझा शालेय वर्गमित्र. त्याने ह्या दिवसातसुध्दा एकही दिवस आपलं हॉस्पिटल आणि तज्ञ सल्ला बंद केलेला नाही. ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ असलेला माझा हा मित्र रोज तापाचे रोगी निर्भयपणे पाहतो.

त्याने त्यांना तपासलं. छातीचा एक्स रे काढला, काही टेस्ट केल्या. सर्व काही नॉर्मल. आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. एक किंचित चिंता होती. टायफॉईडची टेस्ट किंचित पॉझिटिव्ह होती. मनात आलं, ‘करोनापेक्षा टायफॉइड बरा. त्याच्यावर औषधं तरी आहेत.’ काय दिवस आले आहेत! पण दुसऱ्या दिवशी त्यांना सुका खोकला सुरू झाला. त्यांच्या मुलीलासुध्दा ताप आला. पुन्हा मनात संशयाची पाल चुकचुकली. तो डॉक्टर मित्र म्हणाला, “कोविडची टेस्ट करून घेऊया.”

आजच्या दिवसांत हे एक वाक्य अख्खं कुटंब हादरवतं. अशा वेळी विलगीकरण, एकमेकांपासून एकटं दूर राहणं घाबरवतं. ती न पाहिलेली एकाकी कॉट, त्या प्राणवायूचा नळ्या, हॉस्पिटलचं छप्पर वगैरे सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. “कसला कोविड घेऊन बसला आहेस? अरे, साधा फ्लू आहे रे. ९७ टक्के रोगी वाचतात.” वगैरे प्रवचनं ऐकायला स्फूर्तिदायी असतात, पण जेव्हा करोना दूर दुसऱ्याच्या घरात असतो तेव्हा. साठी ओलांडलेल्या माणसाला अशी प्रवचनं हुरूप देतात असं नाही.

कमळ चिखलात उगवतं. चांगल्या दिवसात माणूस चिखल पाहत नाही, कमळ पाहतो. दिवस बदलले की मग त्याला फक्त चिखल दिसतो. आम्ही डोळे फाडून कमळ पाहण्याचा प्रयत्न करत होतो. पण डोळ्याच्या फटीतून चिखलच दिसायचा.

मी माझी ओळख वापरली. त्यामुळे तीन तासात खासगी लॅबमधून माणसं आली आणि सँपल घेऊन गेली. अर्थात त्यासाठी डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. कुणीही उठला आणि टेस्ट करून आला असं होत नाही. टेस्ट ते निकाल हा प्रतिक्षेचा काळ सर्वात कसोटीचा.

एक मन सांगायचं, टायफॉइडच असावा, लक्षणं तशी आहेत. दुसरं मात्र वाईटच चिंतायचं. माझ्या महानगरपालिकेतील मित्रांनी सांगितलं, “उद्या सकाळी साडेआठला निकाल महानगरपालिका वॉर्ड ऑफिसच्या वॉर रूममध्ये येईल. तो पॉझिटिव्ह असेल तर घरी फोन येईल.” आता ‘बीएमसी’ची सिस्टीम चांगली आहे.

निकाल ‘वॉर रूम’मध्ये येतात. मग घरी फोन जातो. जिथे जागा आहेत त्याप्रमाणे रोग्याला विचारलं जातं की कुठे ऍडमिट व्हायचं आहे. वॉर्डची अँब्युलन्स जाते. रोग्याला हॉस्पिटलात नेतात. अर्थात जर गरज असेल तरच. नाहीतर घरी अलगीकरण करतात. घर, मजला ह्याच सॅनिटायझेशन होतं. आलेल्या अनुभवातुन सुधारणा करत ही सिस्टीम बनली आहे.

आमची रात्र तळमळत गेली. लवकर जाग आली. साडेआठनंतर लक्ष सतत घड्याळाकडे जात होतं. वाजलेला प्रत्येक फोन वॉर रूमचा आहे असं वाटायचं. घड्याळाचे काटे सरकत होते, पण रिपोर्ट येत नव्हता. रिपोर्ट नकारात्मक आहे म्हणून फोन येत नाही की कामाचा प्रचंड दबाव असल्याने निकाल आलेला नाही? मनात अनेक प्रश्न उभे राहत होते. नुसता जीवघेणा आशा-निराशेचा खेळ!

शेवटी न राहवून जो स्वॉब घेऊन गेला होता, त्याचा नंबर माझ्याकडे होता, त्याला मी विचारलं की काय झालं. तो म्हणाला, रात्री सँपल उशिरा गेल्यामुळे, चारच्यानंतर निकाल येईल. पाच वाजून गेले. तिकडे रोग्याचा खोकला वाढत होता. ताप उतरत नव्हता. घाईत आणलेलं प्लस ऑक्सिमीटर लावून प्राणवायू चेक केला जात होता. तो ९५ च्या खाली गेला की घालमेल वाढायची.

मग महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला. आधीच हॉस्पिटलात घेऊन जावं का? पण जाणार कसं? जोपर्यंत पॉझिटिव्ह रिपोर्ट हातात येत नाही, तोपर्यंत कोविड इस्पितळात जागा मिळत नाही. मग यावर उपाय काय? रोग्याने खोकत रिपोर्ट कधी येतो त्याची वाट पहावी?

दुसरा मार्ग तापाच्या क्लिनिकमध्ये जायचं. तिथे डॉक्टर तपासणार आणि त्याला वाटलं तर तो जनरल वॉर्ड किंवा संशयित मंडळींच्या विलगीकरण वॉर्डमध्ये ठेवणार. तिथे धोका असतो व्हायरल लोड वाढण्याचा. काय करायचं?

त्यांना जवळच असलेल्या एका मोठ्या इस्पितळात तापाच्या क्लिनिकमध्ये पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण त्यापूर्वी चार-पाच फोन फिरवून बाबापुता करून, कधी भसकन चिडून मी अनधिकृत निकाल काढला. वडील आणि मुलगी पॉझिटिव्ह, बायको निगेटिव्ह. वॉर रूमकडे विचारणा केली. त्यांनी माझा राग शांत करत मला सांगितलं, “आमच्या हातात निकाल येत नाही तोपर्यंत आम्ही पुढे हालचाल करू शकत नाही. तो उद्या सकाळी येईल.” अरे बापरे. मग रात्री हॉस्पिटल लागलं तर जायचं कुठे? रिपोर्ट नाही तर एन्ट्री नाही.

पुन्हा फोन फिरवले. लोकांना मदत करायची आहे, पण रिपोर्ट कुठून आणणार? त्यांना न्यायचं होतं ते मोठं हॉस्पिटल गाडीने पांच सात मिनिटात येणारं होतं. पण गाडी कोण चालवणार? टॅक्सी रिक्षा नाही. असली तरी प्रामाणिकपणे पेशंट पॉझिटिव्ह आहे हे चालकाला सांगायला हवं. मग येणार कोण? अँब्युलन्स शोधायला हवी.

शेवटी त्या ज्येष्ठ व्यक्तीने स्वतःच्या थकलेल्या शरीरात एनर्जी ओतली. स्वतः ड्राईव्ह करत ते मुलीसह हॉस्पिटलात गेले. तिथे ओळख लावली तेंव्हा विलगीकरण कक्षात एक बेड मिळायची शक्यता वाढली.

माझ्या मनाचा तोल ढळत होता. माझी चीडचीड सुरू होती. एवढं असहाय्य वाटावं? लवकर बेड मिळाला नाही तर पेशंटची अवस्था काय होईल ही चिंता. पेशंट पॉझिटिव्ह आहे ठाऊक आहे पण हातात रिपोर्ट नाही. प्रत्येक ठिकाणी बाप दाखव मग श्राद्ध कर. शेवटी लॅबवाल्या माणसाला आधी मी काकुळतीने सांगितलं. मग माझी सहनशक्ती संपली आणि मग स्फोट झाला. त्याने माझ्या मोबाईलवर रिपोर्ट पाठवला. मी हूश्श केलं. त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. पंधरा तास मी फक्त रिपोर्ट, हॉस्पिटल ह्याच चक्रात फिरत होतो.

मग हॉस्पिटलचा शोध सुरू झाला. तोपर्यंत पेशंट त्या मोठ्या हॉस्पिटलात, विलगीकरण कक्षात एक बेड मिळवायला सहा तास बाहेर बसला होता. पोटात अन्न नाही, अंगात ताप आहे. प्राणवायूची लेव्हल कमी-जास्त होतेय आणि त्यात हा मनस्ताप. आजूबाजूला पेशंट, त्यामूळे नव्या संसर्गाची भीती.

मी सगळीकडे फोन केले. कुठे बेड आहे पण ऑक्सिजन नाही. कुठे ‘आयसीयू’ची गॅरंटी नाही. शेवटी एक फोन फळला. पेशंटला त्या मोठ्या हॉस्पिटल मधून परत बोलावलं. त्याच्याबरोबर पूर्ण धडपड अंगात ताप असलेल्या मुलीने केली. ती स्वतःचा आजार वडीलापुढे विसरली. ती आणि ते ज्येष्ठ गृहस्थ त्या जवळपास कोसळलेल्या अवस्थेत घरी गाडी चालवत आले. ते इतके थकले होते की रस्त्यात अपघात व्हायची शक्यता कशीबशी दोनदा टळली.

ते घरी आले, जेवले, मन खंबीर केलं, बायकोला सांभाळून राहायला सांगितलं आणि रात्री दोन वाजता हॉस्पिटलात पोहचले. बाप-मुलगी एकाच हॉस्पिटलात, पण भेट नाही. आई घरी एकटी. ती निगेटिव्ह असल्याचं आम्हाला समाधान. ती मात्र कोसळलेली, एकटी पडलेली. वीस किलोमीटर अंतरासाठी अँब्युलन्स कितीला पडली असेल? सात हजार रुपये. गोव्याचं विमानाचं परतीचं तिकिट कमी आहे यापेक्षा.

मी रात्री थकून गादीवर अंग टाकलं तेव्हा अनेक विचारांनी डोक्यात थैमान घातलं. माझी ओळख असल्याने मी महत्प्रयासाने त्यांना बेड शोधून देऊ शकलो. ज्यांची वर कुठे ओळख नाही त्यांनी कुठे जायचं? चूक ‘बीएमसी’ची आहे का ? नाही. उलट त्यांनी आता चांगली व्यवस्था केलीय.

हॉस्पिटलचं काय? ती भरलेली आहेत. सरकारी किंवा म्युनिसिपल हॉस्पिटलकडे जायची मध्यमवर्गीय माणसाची मानसिक तयारी नाही. तात्पुरती हॉस्पिटल्स उभारली आहेत, पण प्रत्येक रोगी डोक्यात व्हेंटिलेटर ठेवतो आणि प्रायव्हेटकडे पळतो. बरं, रातोरात डॉक्टर्स कुठून आणणार? ब्रह्मदेवाने सुध्दा तशी व्यवस्था केलेली ऐकिवात नाही.

जिथे अमेरिका आणि युरोपची भक्कम पायावर उभी असलेली वैदयकीय व्यवस्था कोसळली तिथे आपण पाचोळ्यासारखे वाहत जाऊ. त्यामुळे एकच करा, गरज नसेल, तर बाहेर पडू नका. सांभाळा. जिथे पोटाचा प्रश्न आहे तिथे तरुणांना बाहेर पडावं लागेल. पण त्यांनीसुध्दा जबाबदारी ओळखली पाहिजे. त्यांच्या घरात लहान मूल आणि ज्येष्ठ नागरिक असतात. त्यांचा संसर्ग घरातल्यांना होऊ शकतो.

ते ज्येष्ठ गृहस्थ अधूनमधून घराबाहेर पडत. कधी भाजी आण, कधी इतर सामान, कधी औषध. त्याला नाईलाज आहे. पण तेव्हासुध्दा काळजी घ्या. किंचितसा निष्काळजीपणाही घातक ठरू शकतो. आपण काहीवेळा इमोशनल होतो. कदाचित त्या गृहस्थाने मासे घेताना चूक केली असेल का? नातवाला मासे आवडतात म्हणून मासे घेताना किंचित चूक झाली असेल का? नातवासाठी कोळीणीकडे एखादा मासा जास्त मागत असताना त्यांच्यावर विषाणूने झडप घातली असेल का? कारण कळत नाही. ते घरी सर्व व्यायाम करतात. सैन्यदलातून निवृत्त झालेला माणूस. पण एक विषाणू गाफीलपणा शोधून झडप घालतो आणि कुटुंबातले तीन जण तीन दिशेला फेकले जातात. डोक्यावर प्रचंड भीतीचं ओझं घेऊन.

म्हणून हात जोडतो. लॉकडाऊन संपला तरी मनावरचा ताबा सोडू नका.

बाय द वे, तो मासे खाणारा मुलगा माझासुध्दा नातू आहे.

इतरांना याविषयी गांभीर्य निर्माण व्हावं यासाठी लेख वाचून झाल्यावर शेअर करा…

द्वारकानाथ संझगिरी यांची फेसबुक पोस्ट-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More