‘…तर शिवसेना फुटली नसती’; एकनाथ शिंदे पहिल्यांदाच बोलले

Eknath Shinde Attack on Uddhav Thackeray 

Eknath Shinde | राज्यात शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत, “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा मोह झाला आणि त्यामुळे पक्षात फूट पडली,” असा मोठा दावा केला आहे. जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेनेत फूट पडली नसती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वशैलीची आठवण करून देत, “बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी मानायचे, पण उद्धव ठाकरेंनी सहकाऱ्यांना नोकर समजायला सुरुवात केली. पक्ष वाढवण्यासाठी सहकार्याची भावना हवी, मालक-नोकराच्या नात्यावर पक्ष मोठा होत नाही,” असे घणाघाती टीकास्त्र सोडले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतील एका बैठकीत घडलेला किस्सा सांगताना शिंदे म्हणाले, “राज्यप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी एका नेत्याला फोन आला, ‘कुठे जाताय?’ उत्तर मिळाले, ‘दिल्ली.’ त्यावर त्या नेत्याने विचारले, ‘मालकासोबत राहणार की नोकरासोबत जाणार?’ हा प्रश्न विचारणारे उद्धव ठाकरेच होते.”

“बंड करण्यासाठी वाघाचं काळीज लागतं”

आपल्या निर्णयाचे समर्थन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी कधीच पदासाठी मागणी केली नाही, ना तडजोड केली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी बंड पुकारले. हा निर्णय सहज नव्हता, पण शिवसेनेच्या भवितव्यासाठी आवश्यक होता. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचे विचार आमच्या पाठिशी होते.”

भगवद्गीतेचा दाखला देत शिंदे म्हणाले, “18व्या अध्यायात म्हटलं आहे, बंड तेच करतात जे स्वाभिमानी असतात. चापलुसी करणारे लोक कधीच उठाव करत नाहीत. बंड करण्यासाठी धाडस लागतं, आणि वाघाचं काळीज लागतं. काही लोक फक्त वाघाचं कातडं पांघरतात, पण वाघ तर वाघच असतो,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली.

“बाळासाहेबांच्या विचारांसाठी मंत्रिपदं सोडली”

बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते, असा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “एकदा शब्द दिला की माघार घेत नव्हते. मी त्यांच्या विचारांचा कट्टर अनुयायी आहे. म्हणूनच आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. नगरविकास खातं, आठ-नऊ मंत्रिपदं सोडली, पण बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं, पण बाळासाहेब नेहमी म्हणायचे की, ‘माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही,’ हे मी पाळत आहे.”  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या वक्तव्यांमुळे शिवसेनेतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गट यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Title : Eknath Shinde Attack on Uddhav Thackeray 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .