EPFO Rule Change l EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ने आपल्या सात कोटीहून अधिक सदस्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. PF खात्याशी आधार लिंक असलेल्या कर्मचाऱ्यांना आता कोणतीही कागदपत्रे अपलोड न करता त्यांचे प्रोफाइल सहज अपडेट करता येणार आहे. यामुळे कंपनीच्या मंजुरीची गरजही संपली असून, कर्मचाऱ्यांची मोठी कटकट मिटली आहे.
EPFO च्या नियमात मोठा बदल :
यापूर्वी, EPF प्रोफाइल अपडेट करण्यासाठी कर्मचाऱ्यांना नियोक्त्याची मंजुरी घ्यावी लागत होती, ज्यामुळे किमान २८ दिवसांचा विलंब व्हायचा. मात्र, EPFO च्या नव्या नियमांमुळे ही प्रक्रिया आता जलद आणि सोपी झाली आहे.
जर UAN (Universal Account Number) आधारशी लिंक असेल, तर तुम्ही कंपनी किंवा नियोक्त्याची परवानगी न घेता खालील माहिती स्वतः अपडेट करू शकता :
१) नाव
२) जन्मतारीख
३) लिंग
४) राष्ट्रीयत्व
५) वडील / आईचे नाव
६) वैवाहिक स्थिती आणि जोडीदाराचे नाव
७) नोकरी सुरू करण्याची व सोडण्याची तारीख
पूर्वीच्या नियमांमुळे वेळ लागत होता, आता अपडेट त्वरित होणार :
2024-25 या आर्थिक वर्षात सुमारे आठ लाख दुरुस्ती अर्ज EPFO ला मिळाले होते, त्यापैकी ४५% अर्ज हे नियोक्त्याच्या मंजुरीशिवाय अपडेट होऊ शकतात. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचणार आहे.
मात्र जर UAN 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी जारी केले असेल, तर कोणतेही बदल करण्यासाठी नियोक्त्याची परवानगी आवश्यक असेल. तसेच पगारातून PF कपात होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी खात्री करावी की त्यांचा आधार आणि पॅन त्यांच्या EPFO खात्याशी लिंक आहे, अन्यथा अपडेट किंवा पैसे काढण्याची प्रक्रिया अडचणीत येऊ शकते.