EPFO l कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund Organisation (EPFO) काढणे आता अधिक सोपे होणार आहे. लवकरच, कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) द्वारे त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठीची तयारी सुरु असून, पुढील तीन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
यूपीआयमुळे व्यवहार सुलभ :
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही सुविधा देण्यासाठी एक योजना तयार करत आहे. यूपीआय (UPI) प्रणालीमुळे सदस्यांना त्यांच्या डिजिटल वॉलेटचा वापर करून पीएफची रक्कम काढता येईल. यामुळे, पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सरकारचा (Indian Government) हा निर्णय, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार अधिक सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ७.४ दशलक्ष सदस्यांना याचा फायदा होईल.
EPFO l दाव्यांचा जलद निपटारा :
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने पीएफ दाव्यांचा निपटारा जलद आणि विनाअडथळा होण्यासाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८.९५ लाख दावे निकाली काढण्यात आले, तर २०२४-२५ मध्ये, पहिल्या तीन दिवसांत १८.७० लाख दाव्यांवर प्रक्रिया करण्यात आली.
ईपीएफओने (EPFO) दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये ४.४५ कोटी दावे निकाली काढण्यात आले आणि १.८२ लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. तर, २०२४-२५ मध्ये ५ कोटी दावे निकाली काढण्यात येऊन २.०५ लाख कोटी रुपयांचे वितरण झाले.