Devendra Fadanvis l संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणातील वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, हा राजीनामा उशिराने घेतला गेला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे.
“फडणवीसांचा भाजप अजेंडा, देशमुख कुटुंबाच्या भावनांशी खेळ” :
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर तीव्र टीका केली. त्या म्हणाल्या, “सगळी माहिती, फोटो, व्हिडिओ हाताशी असूनही फडणवीसांनी अडीच महिने देशमुख कुटुंबीयांच्या भावनांशी खेळ केला. केवळ पक्षीय अजेंडा राबवण्यासाठी त्यांनी या प्रकरणावर मौन बाळगले. त्यामुळे आता नैतिकतेच्या आधारावर त्यांनीही राजीनामा द्यायला हवा.”
त्या पुढे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं आधीच माहीत होतं. मग तीन महिन्यांपासून ‘मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेतला जाईल’ असं का सांगत होते? त्यांनी नेमका कोणता राजकीय अजेंडा राबवला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
Devendra Fadanvis l धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया :
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्यापासूनची मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून मन व्यथित झाले. न्यायालयीन चौकशी प्रस्तावित असून, माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव मी राजीनामा दिला आहे.”
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य करत सांगितले, “धनंजय मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा दिला असून, तो स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यामुळे ते मंत्रिपदातून मुक्त झाले आहेत.”