Top News आरोग्य कोरोना राजकारण

राज्यातील जीम तातडीने सुरु करावेत, विरोधी पक्षनेत्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातले जिम तातडीने सुरु करण्यात यावेत त्याचप्रमाणे हळूहळू सगळ्याच क्षेत्रांचा विस्तार करुन अर्थकारणाला चालना द्यावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. ठाकरे सरकार मद्यविक्रीची दुकानं सुरु करु शकतं तर जिम का नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय.

या पत्रात फडणवीस म्हणतात की, कोरोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना, आता त्यांना आणखी आर्थिक संकटात टाकता येणार नाही. जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहून चालणार नाही. तर त्या संकटाचे सामाजिक, आर्थिक, मनोवैज्ञानिक परिणाम सुद्धा तपासले पाहिजे आणि आरोग्यासोबतच आर्थिक आणि सामाजिक स्वास्थ सुद्धा टिकून राहील. याचाही कटाक्षाने विचार केला पाहिजे. राज्यातील दारू दुकाने उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवल्या जातात, हे अतिशय दुर्दैवी आहे.”

“राज्याचं अर्थकारण टिकलं पाहिजे, हा आपला विचार असेल कदाचित. पण राज्याचं आरोग्य सुद्धा टिकले पाहिजे हा विचार आपण का करू शकत नाही? खरं तर कोरोना नियंत्रणाची संपूर्ण रणनीतीच चुकलीये. ज्या काळात चाचण्यांवर आपण भर द्यायला हवा होता त्या काळात चाचण्या केल्या नाही. नंतर चाचण्या वाढल्या हे भासवण्याचा प्रयत्न झालाय. संख्या वृद्धीसाठी अँटीजेन चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी आज स्थिती अवघड झालीये. महाराष्ट्र हा देश असता तर जगात 6 व्या क्रमांकावर आपण आज आहोत.” असंही फडणवीस यांनी पत्रात नमूद केलंय.

या पत्रात ते पुढे म्हणतात की, “सर्वच क्षेत्रात कायम आघाडीवर राहिलेल्या महाराष्ट्राने आज खरंतर ‘अनलॉक’च्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतलीये. पण दुर्देवाने तसं होताना दिसून येत नाही. केश कर्तनालयं ही अन्य राज्यांमध्ये लवकर उघडण्यात आलीयेत. महाराष्ट्रात ती उघडण्यासाठी आंदोलनाची तयारी करावी लागली. आज जिम सुरू करण्यासाठी सुद्धा अनेक लोक आंदोलनाच्या तयारीत आहेत. माझ्याकडेही सातत्याने विनंती करण्यात येतेय. कोरोना प्रतिबंधक उपाय करीत आपल्याला आता हळूहळू सर्व बाबी खुल्या कराव्याच लागतील. त्याशिवाय पर्याय नाही.”

“फार काळ आपण लोकांच्या अर्थकारणावर निर्बंध घालू शकत नाही. एकतर सरकार स्वत:हून प्रत्येक क्षेत्राला खुले करण्यासाठी काही अभ्यासपूर्ण शिफारसी करायला तयार नाही. त्यात ते-ते क्षेत्र कोरोना प्रतिबंधाची काळजी कशी घेणार, याबाबतचा तपशील सरकारला सादर करून ती क्षेत्रं खुली करण्याची विनंती करत आहेत. असं असताना सुद्धा सरकार पातळीवर कोणतेही नियोजन, उपाययोजना, निर्णयशीलता दिसून येत नाही. ही खरोखरच फारच दुर्दैवाची बाब आहे. राज्यातील जिमचालकांनी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय स्वत:च सूचवले आहेत. यात सरकारला आणखी काही भर घायलाची असेल तर तीही करता येईल. पण, राज्यातील जिम तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे, ही माझी आपल्याला नम्र विनंती आहे.” असं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या काळात कोणतंही राजकारण करू नका, एकनाथ शिंदेंकडून रामदास आठवलेंना खास सल्ला

‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लाखमोलाची मदत

दानवेंचा जावई असा उल्लेख करू नका, आमचा आता कोणताही संबंध नाही- हर्षवर्धन जाधव

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या