देहूत शोककळा! संत तुकाराम महाराजांच्या वंशजाची आत्महत्या; लवकरच होणार होते विवाहबद्ध

Shirish Maharaj More | संत तुकारामांचे ११ वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते ह.भ.प. शिरीष महाराज मोरे (H.B.P. Shirish Maharaj More) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देहू गावात आणि वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. शिरीष महाराजांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

राहत्या घरी घेतला गळफास

मिळालेल्या माहितीनुसार, आज (5 फेब्रुवारी) सकाळी शिरीष महाराज मोरे यांचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांच्या निधनाच्या बातमीने कुटुंबीय, सहकारी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. आज संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

लवकरच बांधणार होते लग्नगाठ

शिरीष महाराज मोरे हे लवकरच विवाहबद्ध होणार होते. त्यांच्या लग्नाचा टिळा कार्यक्रमही नुकताच पार पडला होता. असे असताना त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शिरीष महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिरीष महाराजांनी उचललेले हे पाऊल समस्त देहू ग्रामस्थांसाठी, मोरे कुटुंबीयांसाठी तसेच धार्मिक, आध्यात्मिक आणि कौटुंबिक दृष्ट्या मोठे नुकसान करणारे आहे. महाराजांचे निधन आकस्मिक झाले आहे. या संदर्भात पोलीस सखोल चौकशी करतीलच, मात्र तोपर्यंत त्यांच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या दुःखात आम्हाला आधार द्यावा,” असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे. (Shirish Maharaj More)

संघात कार्यरत, वादग्रस्त वक्तव्यामुळे आले होते चर्चेत:

शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक होते. ते शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. “ज्याच्या कपाळावर टिळा नाही, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा,” असे वादग्रस्त वक्तव्य करून ते चर्चेत आले होते.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. (Shirish Maharaj More)

Title : Famous Speaker H.B.P. Shirish Maharaj More Commits Suicide in Dehugaon