Farmer Good News l राज्य सरकार (State Government) राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ (Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana) अंतर्गत अर्थसहाय्य देत आहे. लवकरच यात वाढ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे केली. या योजनेत वाढ करून शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळणार आहे.
‘नमो शेतकरी’ योजनेत वाढ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते बिहारमधील (Bihar) भागलपूर येथे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या 19 व्या हप्त्याचे वितरण झाले. याचा राज्यस्तरीय कार्यक्रम वनामती येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मुख्यमंत्री म्हणाले, “केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा सन्मान निधी देते. राज्य सरकार ‘नमो किसान सन्मान निधी’ योजनेद्वारे 6,000 रुपये देते. आता राज्य सरकार यात 3,000 रुपयांची वाढ करणार आहे.”
राज्य सरकारकडून मिळणारे 9,000 रुपये आणि केंद्राचे 6,000 रुपये असे एकूण 15,000 रुपये प्रति वर्ष शेतकऱ्यांना मिळणार आहेत. हि घोषणा सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात आली आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कृषिमंत्र्यांची अनुपस्थिती :
कृषी विभागाशी संबंधित या महत्त्वाच्या कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) मात्र अनुपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
या कार्यक्रमात योजनेच्या लाभाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.