Pune l पिंपरी-चिंचवडमधील काही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन त्रासदायक बुलेटचालकांना ‘प्रसाद’ देत नुकतेच वठणीवर आणले. निगडी परिसरात शाळा, महाविद्यालय परिसरात काही तरुण मुले बुलेट घेऊन फिरतात. माता अमृतानंद शाळा, शिवभूमी शाळा, मॉडर्न शाळा, एसपीएम शाळा परिसरात बुलेटमधून फटाके फोडल्याचा आवाज काढण्याचा प्रकार सर्रास सुरू होता. या बाबत अनेक नागरिकांनी, तसेच शालेय आणि महाविद्यालयीन मुलींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले आणि भाजपचे माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांच्याकडे तक्रार केली होती.
“तरुणांकडून परिसरात होणाऱ्या त्रासाबद्दल गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिक आणि महिला आमच्याकडे सातत्याने तक्रार करीत होत्या. सोमवारी अचानक काही महिलांचे वारंवार फोन आले,” असे माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी सांगितले.
पाठलाग करून चोप:
याची दखल घेऊन चिखले, केंदळे आणि भाजप कार्यकर्ते बापू घोलप यांनी या बुलेटस्वारांना धडा शिकविण्याचा निश्चय केला. सोमवारी (३ फेब्रुवारी) आणि मंगळवारी (४ फेब्रुवारी) सकाळी परिसरात उपस्थित राहून तिघांनी बुलेटस्वारांची वाट पाहिली. ते ‘ट्रिपल सीट’ आल्यावर या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. “मनसे स्टाइल’ने तरुणांच्या कानाखाली फटाके वाजवले.
“निगडी परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात काही तरुण सातत्याने त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी त्यांचा पाठलाग करून त्यांना ‘मनसे स्टाइल’ने चोप दिला; तसेच निगडी पोलिस ठाण्यात जाऊन या मुलांविरोधात तक्रार देऊन त्यांच्यावर योग्य कारवाईची मागणी केली आहे,” असे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.
Pune l महाविद्यालय परिसरात गस्त:
यापुढे महाविद्यालयांच्या परिसरात आमचे कार्यकर्ते गस्त घालतील, असेही चिखले यांनी सांगितले. तुम्ही कोणत्या कॉलेजला आहात, कॉलेजचे ओळखपत्र आहे का, या भागात काय करता, तुमचे आई-वडील काय करतात,” असे प्रश्न विचारले असता तरुणांना उत्तरे देता आली नाहीत.
या कारवाईमुळे निगडी परिसरातील शाळा, महाविद्यालय परिसरात बुलेटमधून फटाक्यांचा आवाज काढून दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणांना चांगलाच धडा मिळाला आहे.