गृहमंत्री अनिल देशमुखांसह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा- तृप्ती देसाई
मुंबई | राज्यात चर्चेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात राज्य सरकारने उचलबांगडी केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. सचिन वाझेंना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रूपये वसुल करायला सांगितलं असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपानंतर देशमुख यांच्यावर टीका होत असून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
गृहमंत्री पोलिसांना हप्ते गोळा करायला सांगतात, खंडणी वसूल करायला सांगतात आणि हे जेव्हा पुराव्यानिशी समोर येते तेव्हा तातडीने नैतिकता म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे. परंतु अनिल देशमुख आणि त्यांचे साथीदार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे तरच हे सरकार पारदर्शक आहे असे म्हणता येईल, असं म्हणत तृप्ती देसाईंनी देशमुखांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्यात नेमकं काय चाललं आहे हे महाविकासआघाडी सरकार आहे की “महावसुली सरकार”आहे. राज्यातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले, महिलांच्या हत्येचे आरोप करण्यात आले ,काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले परंतु कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या. गृहमंत्र्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेलं हे षडयंत्र आहे, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
बाबो! ख्रिस जॉर्डनने एका हातात घेतलेल्या अफलातून झेलवर सगळेच फिदा, पाहा व्हिडीओ
मुख्यमंत्र्यानी परमबीर सिंह यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी करावी- अनिल देशमुख
“आता कळलं का?,वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता”
“आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता”
Comments are closed.