Farmer News l शेती हा अनेक धोक्यांनी भरलेला व्यवसाय आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, रस्ते अपघात यासारख्या घटनांमध्ये शेतकरी बांधवांचा मृत्यू होणे किंवा अपंगत्व येणे ही दुर्दैवी घटना घडू शकते. अशा संकटात शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबवली आहे.
या योजनेअंतर्गत, अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाते. तसेच, अपंगत्व आल्यास देखील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाते.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ९८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या कुटुंबियांना १ कोटी ९६ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे, ही बाब शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे.
योजनेचा लाभ कोणाला मिळतो? :
-नैसर्गिक आपत्तीमुळे (पूर, दुष्काळ, वादळ इ.) मृत्यू झाल्यास
-रस्ते अपघात किंवा इतर कोणत्याही अपघातात मृत्यू झाल्यास
-अपघातामुळे अपंगत्व आल्यास
Farmer News l मदतीचे स्वरूप :
-अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना २ लाख रुपयांची मदत
-दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये
-एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये
-१० ते ७५ वयोगटातील कुटुंबातील दोन सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
अर्ज कसा करावा? :
अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडे घटना घडल्यापासून तीस दिवसांच्या आत सादर करावा.