Pune News | नांदेड गावातील रहिवाशांमध्ये ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराचा धोका वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. जलद प्रतिसाद पथकाच्या बैठकीत या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
सर्वेक्षणातील धक्कादायक बाबी :
-नांदेड गाव परिसरातील २६ रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण शून्य टक्के आढळले.
-पुणे विभागात ३ फेब्रुवारीपर्यंत ‘जीबीएस’च्या १६३ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ७७ रुग्ण एकट्या नांदेड गावातील आहेत.
-नांदेड गावातील ७७ रुग्णांपैकी ६२ रुग्णांच्या घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ३६ रुग्णांच्या घरातील पाण्यामध्ये पुरेशा प्रमाणात क्लोरिनचे प्रमाण दिसून आले, तर २६ घरांमध्ये मात्र क्लोरिनचे प्रमाण शून्य आढळले.
-बहुतांश रुग्ण नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता), धायरी, नांदेड गाव या परिसरातील आहेत.
-या परिसरातील रुग्णांचा पुण्यातील अन्य भागांशी किंवा जिल्ह्याशी संबंध येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शहरातील अन्य परिसरात किंवा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण आढळून आलेले नाहीत.
Pune News l जलद प्रतिसाद पथकाच्या सूचना:
– जैव वैद्यकीय तपासणीचे नमुने आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत पाठवावे.
– रुग्णांचे रक्त नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठवावे.
– आयव्हीजी इंजेक्शनचा पुरेसा साठा असावा.
– इंजेक्शनची जादा दराने विक्री होऊ नये यासाठी विक्रेत्यांची तपासणी करावी.
– घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांचे समुपदेशन करावे.
– काही सोसायट्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी येत असल्याने तेथील पाण्याची तपासणी करावी.
– पुणे, पिंपरी-चिंचवडमधील गेल्या दोन वर्षांतील रुग्णांची माहिती रुग्णालयांकडून प्राप्त करावी.
– एक डिसेंबरनंतरच्या डायरियाच्या रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी ‘एनआयव्ही’कडे पाठवावे.
– अन्य भागांमध्ये रुग्ण आढळणार नाही याची काळजी घ्यावी.
– रुग्णालय आणि विक्रेते यांच्याकडील औषधांच्या साठ्याची माहिती घ्यावी.
चिकन दुकानांची पाहणी:
पाण्याबरोबरच कच्च्या चिकनमध्ये ‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ हा जीवाणू आढळून येतो. त्यामुळे चिकन दुकानांची पाहणी करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने चिकनचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत, तर महापालिका पशुवैद्यकीय विभागाने सिंहगड रस्ता, धायरी, नांदेड गाव परिसरातील १९२ चिकन दुकानांची पाहणी करून त्यांना स्वच्छता राखण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
पथकामध्ये १४ जणांचा समावेश:
आरोग्य विभागाने जलद प्रतिसाद पथकाची स्थापना केली असून, यामध्ये राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) शास्त्रज्ञ, अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आरोग्य प्रमुख, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, न्युरोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष, आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेतील अधिकारी, तसेच आरोग्य विभागाच्या विविध विभागांमधील अधिकारी अशा १४ जणांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर, नांदेड गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची शुद्धता राखण्याची गरज आहे. तसेच, चिकन पूर्णपणे शिजवून खावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.