गिरीश बापट म्हणजे राजकारणातला बाप माणूस!

भाऊंनी अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना खूप ताकद दिली, त्यांना मोठं केलं, त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी कधी कधी टोकाला जाऊन मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीचे सगळे वार त्यांनी आपल्या अंगावर झेलले. अनेकांशी संघर्ष केला, पण कार्यकर्त्यांची अतिशय काळजी घेणे आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संबंध कसा असायला पाहिजे याचे मूर्तीमंत उदाहरण बापट साहेबांनी घालून दिले. कार्यकर्त्यांवर, काम करणाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची अतिशय काटेकोर काळजी त्यांनी घेतली. अशाप्रकारची काळजी होतकरू कार्यकर्त्यांसाठी सकस राजकीय वाटचालीसाठी खूप महत्वाची असते.

राजकारणात त्यांनी त्यामुळेच एक आपली वेगळी धाटणी आणि वेगळी शैली तयार केली, ती लोकांना नैसर्गिकपणे जोडण्याची होती. त्याच पद्धतीने लोकांना आपलेसे वाटेल एवढी जवळीक निर्माण करणारी होती. त्यामुळे त्यांचा परिवार हा इतका मोठा आहे की, राजकीय आणि सामाजिक काम करणारा प्रत्येक जण बापट साहेबांना आपलं मानतो. लोकांचे हे मानणे नैसर्गिक होत. गिरीश भाऊंनी स्वतःच्या बळावर कुठल्याही अन्य नेत्याचे शैली आत्मसात न करता, कुठल्याही अन्य नेत्याला आपला ह्या कामासाठी आयडॉल न मानता ही स्वत:ची शैली विकसित केली होती. त्यामुळे त्या दृष्टीने असं नेतृत्व करणारे ते बहुदा एकमेव स्वयंभू नेते असावेत. अशी शैली ही तुम्ही मनापासून काही करू इच्छित असलं तरच होऊ शकते. तिच्यासाठी कृत्रिम प्रयत्न करावे लागत नाहीत. आज मनापसून सबंध जोडणे सोडाच पण काही काम करण्याची ही अनेकांची मानसिकता नाही हे दिसते. त्यामुळे भाऊंसारखे सबंध तयार होणार कसे? विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना गिरीश बापट यांच्यासारखे व्हायचे आहे. पण गिरीश बापटांसारखे सर्व काही सोसून काम करायची तयारी आणि इच्छा त्यांच्याकडे नाही. सगळं इन्स्टंट मिळू शकत नाही.

अनेक लोक बापट साहेबांकडे यायचे, त्यांच्याकडे येऊन काहीतरी मिळवायचं ह्या दृष्टिकोनातून रोज चक्कर मारायचे, त्यांना फोन करून आजारपणातही त्रास द्यायचे, त्यांचे स्वास्थ्य बिघडेल इतका पाठपुरावा करायचे, आणि त्यातून आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न करायचे, इतक्या खालच्या स्तरावर गेलेले लोक माझ्या पाहण्यात आहेत अथवा मला त्यांच्याबद्दल माहिती आहे. माझ्या बारा-पंधरा वर्षाच्या त्यांच्याबरोबरच्या वाटचालीत मी या गोष्टी पहिल्या. माणूस हा जसा सामाजिक प्राणी आहे तसाच तो अतिशय पराकोटीचा स्वार्थी प्राणी आहे. आपण ह्या स्वार्थातून बाहेर पडायचं असतं तीच आपली खरी दिशा असते. बापट साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर नि:स्वार्थपणे लोकांच्या मदतीची कामे केली. पण दुर्दैवाने असं म्हणायला लागतं की खूप लोकांना त्यांनी जी मदत केली, त्यातले अनेक लोक आपल्या स्वार्थात इतके गुरफटले की नंतरच्या बापट साहेबांच्या वाटचालीमध्ये त्यांना सोडून गेले. या लोकांनी भाऊंना सोडून जाऊन आपला स्वार्थ दुसरीकडून साध्य करण्यातच फार मोठी धन्यता मानलेली दिसली.

राजकारणातला बाप ही कन्सेप्ट बापट साहेबांनी मला सांगितली होती. एकदा पुणे आणि दिल्लीच्या प्रवासात गप्पा मारत असताना भाऊंनी त्याचा उल्लेख केला होता. त्यांचा त्यातला दृष्टीकोन एकच होता की, तुम्ही एक दिशा धरून काम करत जा. एक दिशा धरली तुमच्यासमोर कोणीतरी आयडॉल असतो, त्यानुसार तुमचा एक दृष्टीकोन ठरतो. अशा प्रकारचा दृष्टीकोन ठेवला तर तुमच्यासाठी ही वाटचाल महत्त्वाची ठरते. यामुळे तुमची वैचारिकता, तुमचं डेडीकेशन, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुमची विश्वासार्हता पणाला लागत नाही. मला असं वाटतं की राजकीय शिक्षणासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट बापट साहेब त्यावेळी बोलून गेले. त्यावर अंमल करण्यासाठी मी त्या दिवशी ठरवलं की आपण राजकारणात बापट साहेबांचं बोट धरून आलो होतो, आणि ज्या वेळेस हे बोट सुटेल त्यावेळेस वाटचालीसाठी परत राजकारणातला बाप म्हणून मी दुसरे कुठलेही बोट धरणार नाही. माझ्यासाठी राजकारणात गिरीश भाऊ बापट हा एक अतिशय खरा राजकारणी ज्याने समाजासाठी पूर्ण आयुष्य वेचलं. तसाच माणूस आणि एकमेव माणूस राजकारणातला बाप बनू शकतो. अन्य कोणीही मी मानले तर माझे नेते होऊ शकतात मात्र माझ्या राजकारणात गिरीश बापट हा पहिला आणि शेवटचा राजकीय बाप होय.

-सुनील माने

महत्त्वाच्या बातम्या-