EPFO l पगारदार व्यक्तींसाठी महत्त्वाची बातमी! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर ८.२५% निश्चित केला आहे. आरबीआयने (RBI) रेपो दरात कपात केल्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु ईपीएफओने व्याजदर कायम ठेवले आहेत.
२०२२-२३ मध्ये किरकोळ वाढ :
सन २०२२-२३ मध्ये व्याजदरात किरकोळ वाढ होऊन तो ८.१५% करण्यात आला होता. त्यानंतर, फेब्रुवारी २०२४ मध्ये व्याजदर थोडा वाढवून ८.२५% करण्यात आला होता.
सध्याची परिस्थिती, आरबीआयने रेपो दरात केलेली कपात आणि केंद्र सरकारने (Central Government) अर्थसंकल्पात (Budget) करदात्यांना दिलेला दिलासा यामुळे पीएफच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अनेक तज्ज्ञांनी व्याजदरात कपात होण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु ईपीएफओने व्याजदर ८.२५% कायम ठेवले आहेत.
गेल्या वेळी २०२३-२४ मध्ये व्याजदरात वाढ झाली होती. त्यानंतर पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अर्थव्यवस्थेमध्ये मागणी आणि वापर वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे, आधी करांमध्ये सवलत आणि आता मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांच्या व्याजदरात वाढ अपेक्षित होती, जेणेकरून ते अधिक बचत आणि खर्च करतील, असा अंदाज होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत २०२४-२५ साठी पीएफ ठेवींवर ८.२५% व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीटीने (CBT) मार्च २०२१ मध्ये ২০২০-२१ या आर्थिक वर्षासाठी पीएफ ठेवींवर ८.५% व्याज देण्याचा निर्णय घेतला होता.
EPFO l अर्थ मंत्रालयाची मंजुरी आवश्यक :
सीबीटीच्या निर्णयानंतर, २०२४-२५ मधील ठेवींवर व्याजदराच्या सहमतीसाठीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला पाठवण्यात येईल. केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर देशभरातील सात कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यात व्याज जमा केले जाईल. अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून सरकारकडून निर्णय झाल्यानंतर ईपीएफओकडून व्याज दिले जाते.
याआधी १९९२-९३ मध्ये सर्वाधिक १२% वार्षिक दराने व्याज देण्यात आले होते. त्यानंतर मात्र व्याजदरात हळूहळू कपात करण्यात आली. २००२-०३ मध्ये व्याजदर ९.५०% होता.