Swargate Rape Case | स्वारगेट ( Swargate Rape Case) बसस्थानक परिसरात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघड झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकाच्या जवळच पोलीस चौकी असतानाही आरोपीने असा अमानुष गुन्हा करण्याची हिंमत दाखवली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तातडीची बैठक बोलावली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनीही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
महिला सुरक्षेसाठी परिवहन मंत्र्यांची तातडीची बैठक
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेची गंभीर दखल घेत गुरुवारी दुपारी १२ वाजता मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा केली जाणार आहे. प्रवासादरम्यान महिलांची सुरक्षा हा मुख्य मुद्दा असणार असून, पुढील उपाययोजना यामध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत.
बैठकीत जुन्या निर्लेखित (Scrap Buses) बससंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बसकडे दुर्लक्ष झाल्याने त्या अवैध धंद्याचे अड्डे बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यात कोणत्याही बसस्थानकात अशा निर्लेखित बसेस उभ्या राहू नयेत, यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ( Swargate Rape Case)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडक आदेश
या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी थेट संवाद साधून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. “या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी,” असे आदेश त्यांनी पोलिसांना दिले.
अजित पवार: आरोपीला फाशीचीच शिक्षा हवी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “स्वारगेट बसस्थानकातील बलात्काराची घटना सुसंस्कृत समाजासाठी संतापजनक आणि लाजिरवाणी आहे. आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य आहे. त्याला फाशीशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा असू शकत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर बसस्थानकातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिसांची वर्दळ आणि सुरक्षारक्षक असतानाही हा प्रकार कसा घडला, यावर चर्चा सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार नव्या योजना आखत असले तरी या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याप्रकरणी सरकारने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कडक शिक्षा दिली जावी, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जात आहे. ( Swargate Rape Case)
Title : Government Takes Action After Swargate Rape Case