Budget 2025 l छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची मोठी घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 च्या अर्थसंकल्पात या ऐतिहासिक स्मारकांसाठी निधी मंजूर केल्याची माहिती दिली. शिवाय, पुण्यातील शिवसृष्टी प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक :
शिवाजी महाराजांची मुघलांच्या नजरकैदेतून सुटका हा इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग आहे. या घटनेला उजाळा देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्याने आग्र्यात भव्य स्मारक उभारले जाणार आहे. हे स्मारक भविष्यातील पिढ्यांना शिवरायांच्या शौर्यगाथेची साक्ष देणारे ठरणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील आंबेगाव येथे शिवसृष्टी प्रकल्प चार टप्प्यांत सुरू करण्यात आला आहे. त्यातील दोन टप्पे पूर्ण झाले असून, उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित असून, शिवरायांचा इतिहास आधुनिक पद्धतीने नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हेतू आहे.
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक :
छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान आणि औरंगजेबाच्या सैन्याशी केलेला पराक्रम यांना मान्यता देण्यासाठी कोकणातील संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे संभाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांसह पराक्रमाची शर्थ केली होती. त्यांच्या त्यागाची आणि शौर्याची आठवण जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक ऐतिहासिक महत्त्वाचे ठरणार आहे.
संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ तुळापूर आणि समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे भव्य स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, प्रत्येक वर्षी एका प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार देण्यात येणार आहे.
तसेच मराठ्यांच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे देखील विशेष स्मारक उभारले जाणार आहे. हरियाणा सरकारच्या सहकार्याने या स्मारकासाठी जागा उपलब्ध केली जाणार असून, मराठ्यांच्या इतिहासाचा गौरव संपूर्ण देशासमोर मांडला जाणार आहे.
या स्मारकांच्या उभारणीमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे पराक्रम, बलिदान आणि स्वराज्यासाठी केलेल्या लढ्यांचे दर्शन घडणार आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.