पुण्यात उन्हाचा तडाखा वाढला; हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज

Weather Update l जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून वातावरणात बदल होऊन, पुण्यातील (Pune Weather Update) उन्हाचा चटका वाढला आहे. दुपारनंतर उकाडाही वाढला असून, गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानासह किमान तापमानही वाढले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या संकेतांनुसार, या आठवड्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

थंड वाऱ्यांना अडथळा:

प्रतिकूल परिस्थितीमुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना पश्चिम-मध्य भारत आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील थंडीचा जोर ओसरला आहे.

या वातावरणीय बदलांमुळे पुण्यातील (Pune Temp) तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पुढे गेला असून, दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके जाणवत आहेत. उकाडाही वाढला आहे. नागरिक उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल खरेदीला प्राधान्य देत आहेत.

रात्रीचा गारवाही कमी झाला असून, मंगळवारी शहरातील कमाल तापमान ३४.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कोरेगाव पार्क भागात ३६, मगरपट्टा परिसरात ३५.७, लोहगाव ३३.८, एनडीए परिसरात ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. अकोल्यात राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस, तर अहिल्यानगरमध्ये नीचांकी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update l पुढील दोन दिवसांचा अंदाज:

‘आयएमडी’च्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यातील वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, रात्री उशिरा किंवा पहाटे सौम्य धुके पडू शकते.

News Title: Heat Intensifies in Pune; Partly Cloudy Weather Predicted for Two Days