Weather Update l महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांनी जोर धरला असून, मार्च महिन्यात नागरिकांना उष्णतेचा अधिक त्रास जाणवणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र भागांमध्ये तापमान वाढत असून, अनेक ठिकाणी ते 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. दुसरीकडे, कोकण किनारपट्टी आणि मुंबईत ढगाळ वातावरणामुळे हवामानात अचानक बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणात ढगाळ हवामान, तर इतरत्र उष्णतेचा कहर :
गेल्या 24 तासांत मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यात ढगाळ हवामानामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सूर्य ढगांच्या आड असल्याने प्रखर उन्हाचा त्रास कमी असला तरी दमट हवामानामुळे उष्णता अधिक जाणवत आहे. हवामान खात्याने राज्यातील काही भागांमध्ये उन्हाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे. परिणामी, आर्द्रता वाढून उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवेल.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, सातारा, रत्नागिरी, परभणी, गडचिरोली, नागपूर, धुळे आणि जळगावमध्ये तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे नोंदवले गेले आहे.
Weather Update l मुंबईत उष्णतेच्या दोन लाटा :
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मुंबईत उष्णतेच्या दोन लाटा येण्याची शक्यता आहे. यामुळे शहरातील कमाल तापमान 36 अंशांपर्यंत पोहोचेल, तर राज्यातील काही ठिकाणी 40 अंश सेल्सिअसचा भीषण टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. मुंबईत मार्च महिन्यातील सरासरी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस असते, पण यंदा ते 36 अंशांदरम्यान राहील. त्यामुळे या वर्षीचा उन्हाळा अधिक तीव्र जाणवेल.
मुंबई – 35.3 अंश सेल्सिअस
पुणे – 37.7 अंश सेल्सिअस
नाशिक – 36.3 अंश सेल्सिअस
सातारा – 37.3 अंश सेल्सिअस
सोलापूर – 38.9 अंश सेल्सिअस
दिल्लीमध्ये तापमानात किंचित घट झाली असून, काश्मीरमध्ये सोमवारी पाऊस झाला. तसेच, पर्वतीय भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली आहे. उत्तराखंडच्या चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर आणि पिथोरागढ येथे पुढील 24 तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील किन्नौर, कुल्लू आणि चंबामध्ये हिमवृष्टीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.