महाराज लाच देऊन सुटले म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकरांना हेमंत ढोमेने सुनावलं, म्हणाला ‘स्वस्तातल्या…’

Rahul Solapurkar l छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला देखील महाराजांनी लाच दिली होती… असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले आहे. महाराजांबद्दल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय आणि सिने क्षेत्रातून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता दिग्दर्शक हेमंत ढोमे याने देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सोलापूरकरांवर निशाणा साधत, ‘स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे!’ असे तो म्हणाला आहे.

एक्सवर पोस्ट शेअर करत हेमंत ढोमे याने राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका केली. ‘इतिहासाला त्याच्या जागी राहूद्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमध्येच रमूद्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगच सगळे सोलापूरकर बदनाम होतात! #जयशिवराय’ असे हेमंत ढोमे म्हणाला आहे. सध्या दिग्दर्शकाचे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी अशी मागणी हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. “छत्रपतींच्या बुद्धीचातुर्यावर आणि धाडसावर शंका घेणे हे पापच… आग्रा येथून सुटताना महाराज लाच देऊन सुटले हे राहुल सोलापूरकर यांचे विधान धक्कादायक आहे…” असे आनंद दवे म्हणाले.

“छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. मोहसीन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचे.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रूपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावे लागते. मग ती रंजकता आली की इतिहास बाजूला टाकला जातो…” सध्या सोलापूरकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

News Title : hemant-dhome-slams-rahul-solapurkar-over-controversial-statement-on-chhatrapati-shivaji-maharaj