Car Fraud l मुंबईमध्ये (Mumbai) महाराष्ट्राबाहेरील व्यापाऱ्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून, त्याआधारे कर्ज घेऊन महागड्या गाड्या खरेदी करणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात जणांना अटक करून सव्वा सात कोटींच्या 16 महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आंतरराज्यीय टोळीचा कारनामा :
महाराष्ट्राबाहेरील व्यापाऱ्यांचा जीएसटी (GST) क्रमांक मिळवून, त्यावरून त्यांची कागदपत्रे मिळवून बनावट कागदपत्रे तयार करायची आणि त्यावर कर्ज घेऊन महागड्या गाड्या खरेदी करून त्यांची विक्री करायची, अशी या टोळीची कार्यपद्धती होती. रवींद्र दिनानाथ गिरकर उर्फ परदीप रविंदर शर्मा (47), मनिष सुभाष शर्मा (39), सय्यद नावेद सय्यद जुल्फीकार अली (52), दानिश रफिक खान (32), साईनाथ व्यंकटेश गंजी (29), यशकुमार सुनिल कुमार जैन (33) आणि इमान अब्दुल वाहिद खान उर्फ देवा (38) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) इंदोर (Indore), कल्याण (Kalyan), डोंबिवली (Dombivali), ठाणे (Thane), भिवंडी आणि कुर्ला येथे राहणारे आहेत. पार्कसाईट पोलीस (Parksite Police) ठाण्यात 2023 मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीतून पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीच्या कारनाम्यांचा छडा लावला. उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे (Dutta Nalawade) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कारपैकी तीन गाड्या चोरीच्या आहेत.
Car Fraud l गुन्हे शाखेची कारवाई :
तपास पथकाने शर्माची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हे शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलिस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलिस निरीक्षक शामराम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अमोल माळी, समीर मुजावर यांच्या पथकाने इंदोर, कल्याण, डोंबिवली, ठाण्यातून इतरांना अटक केली.
या टोळीने वेगवेगळ्या राज्यांतील व्यापाऱ्यांचे कर्जाचे सिबिल स्कोअर काढून त्यांच्या नावे बनावट कागदपत्रे तयार केली. त्या आधारे मोठ्या कंपन्यांच्या 16 कारवर बँकांकडून कर्ज काढले. त्या कारचे चेसिस नंबर बदलून त्या नव्या कोऱ्या कार उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), दिल्ली (Delhi), गुजरात (Gujarat), मध्यप्रदेशसह विविध राज्यांत कमी किमतीत विकल्या. तसेच, चोरीच्या वाहनांवर बनावट चेसिस आणि इंजिन क्रमांक लावून त्यांचीही परराज्यात विक्री केली होती.
अशी करायचे विक्री :
बनावट नावाने आधारकार्ड (Aadhaar Card), पॅनकार्ड (PAN Card), वाहनांचे आरसी बुक (RC Book), एमएमआरडीएचे (MMRDA) अॅलॉटमेंट लेटर, बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न (IT Return) आदी कागदपत्रांची फाइल तयार करून त्या आधारे ही टोळी मुंबईतील विविध बँकांकडून वाहन कर्ज मिळवून विविध कंपन्यांच्या महागड्या कार खरेदी करत असे.
त्यानंतर त्या गाड्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये बनावट आरसी बुक बनवून विक्री करत असे. न घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्त्यांची नोटीस बँकांनी व्यापाऱ्यांना पाठवल्यामुळे या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.