Jasprit Bumrah l भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद मिळणार नाही, असा निर्णय निवड समितीने घेतल्याचं कळतं आहे. यामागे बुमराहच्या खेळाच्या लोड व्यवस्थापनाचं कारण देण्यात आलं आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी बुमराहला नाही उपकर्णधारपद :
आयपीएल 2025 संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी अद्याप संघ जाहीर झालेला नसला तरी, काही महत्त्वाचे निर्णय आत्ताच चर्चेत आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) उपकर्णधार म्हणून सहभाग नाकारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उपकर्णधाराची आणि कार्यवाहक कर्णधाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या बुमराहला आता इंग्लंडसाठी हा मान मिळणार नाही. कारण निवड समिती त्याच्यावरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचलणार आहे.
बुमराह इंग्लंडमध्ये सर्व पाच कसोटी सामने खेळणार नसल्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपद न सोपवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. निवडकर्त्यांना असे वाटते की, उपकर्णधार असा खेळाडू असावा जो सर्व सामने खेळू शकतो. त्यामुळे, प्रत्येक सामन्यासाठी वेगळा उपकर्णधार नेमण्याऐवजी हा पदभार दुसऱ्या पात्र खेळाडूकडे देण्यात येणार आहे.
Jasprit Bumrah l पुन्हा एकदा दुखापतीचा परिणाम? :
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या बुमराहला त्याच मालिकेत पायाची दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन महिने क्रिकेटपासून दूर होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी व अर्धा आयपीएल सिझन गमावावा लागला. गेल्या वर्षभरात बुमराह भारतीय संघासाठी सर्वाधिक मॅच खेळणारा आणि भार उचलणारा गोलंदाज ठरला होता. त्यामुळे आगामी इंग्लंड दौऱ्यात त्याला विश्रांती देण्याचा विचार केला जातोय.
मुंबई इंडियन्ससाठी बुमराहने 2025 च्या आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यानंतर सात सामन्यांमध्ये 17.72 च्या सरासरीने 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडून इंग्लंड दौऱ्यातही चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा असली तरी त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी नको, ही संघ व्यवस्थापनाची भूमिका असल्याचं दिसतं.