Jayant Patil | राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या हालचालींनी नव्या चर्चांना सुरूवात केली आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या बंगल्यावर जाऊन तब्बल एक तास चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बैठकीस भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) देखील उपस्थित होते.
मतदारसंघातील कामासाठी की काहीतरी वेगळं?
जयंत पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “माझ्या मतदारसंघातील महसूल विभागाशी संबंधित काही कामांसाठी ही भेट घेतली. त्यांना काही निवेदनं दिली.” मात्र, ही भेट रात्री 8 वाजता झाली असल्याने आणि ती तब्बल एक तास चालल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमुळे जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जयंत पाटील शांत का? भाजपमध्ये जाणार का?
गेल्या काही महिन्यांत राज्यात अनेक राजकीय वाद उफाळले. मग ते मसाज प्रकरण असो किंवा साहित्य संमेलनातील वाद, जयंत पाटील यांनी या कोणत्याही मुद्द्यावर कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. राष्ट्रवादीचे (Sharad Pawar Group) प्रदेशाध्यक्ष असूनही त्यांनी मौन बाळगल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी सोडली तेव्हा त्यांनी जयंत पाटलांनाही आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, जयंत पाटील हे शरद पवार यांच्यासोबत राहिले. आता मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, त्यामुळे त्यांची पक्षातील भूमिका कमकुवत होत असल्याची चर्चा आहे.
अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “काही दिवसांपूर्वी राजारामबापू कारखान्याच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी (Nitin Gadkari) आले होते, त्यावेळीही जयंत पाटलांची देहबोली वेगळंच सांगत होती. शरद पवार गटातील अंतर्गत गटबाजीमुळे ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी काही मोठा निर्णय घेतला तरी आश्चर्य वाटणार नाही.”
राष्ट्रवादी आणि भाजपमधील राजकीय समीकरण बदलणार?
जयंत पाटील आणि बावनकुळे यांच्या भेटीला अधिकृतरीत्या कोणताही राजकीय रंग देण्यात आलेला नसला, तरी या भेटीमुळे मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत हालचालींना नवी दिशा मिळेल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Title : Jayant Patil Secret Meeting with BJP Leaders