Jaykumar Gore | मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेला अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत त्यांनी आज विधानसभेत आपले मत मांडत सर्व आरोप फेटाळले.
2017 मधील सातारा न्यायालयातील प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “2019 मध्येच न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे, तरीही माझी बदनामी करण्यासाठी हेतुपुरस्सर हे प्रकरण बाहेर काढले गेले.”
“संजय राऊतविरोधात हक्कभंग प्रस्ताव”
जयकुमार गोरे यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि ‘लय भारी’ यूट्यूब चॅनेलच्या तृषार आबाजी खरात (Trushar Abaji Kharat) यांच्यावरही निशाणा साधला. “संजय राऊत यांनी माध्यमांसमोर माझी बदनामी केली आणि माझा व सभागृहाचा विशेषाधिकार भंग केला. ‘लय भारी’ चॅनेलने 87 व्हिडीओ बनवत सातत्याने माझ्या आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली. त्यामुळे मी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे.”, असं गोरे यांनी म्हटलं.
“राज्यपालांकडे खोटे निवेदन सादर, चौकशीची गरज”
जयकुमार गोरे यांनी विधानसभेत सांगितले की, “राज्यपालांना कुणीतरी खोटे निवेदन दिले आणि सरकारने त्यावरून चौकशीसाठी पोलिसांकडे कागदपत्रे पाठवली. मात्र, चौकशीदरम्यान, ज्या व्यक्तींनी त्यावर सही केल्याचे भासवले, त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांचा अर्जाशी काहीही संबंध नाही.”
जयकुमार गोरे यांनी दावा केला की, विधान परिषद निवडणुकीतील पराभव सहन न झाल्यामुळे काही विरोधकांनी त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले आहे. शेवटी, त्यांनी ठाम भूमिका घेत म्हटले की, “जर मी दोषी असेल, तर मला फासावर द्या, पण खोट्या आरोपांवर कारवाई झाली पाहिजे. कोणी खोटे अर्ज सादर करून कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करू नये.”
Title : Jaykumar Gore Responds to Allegations Calls it a Political Conspiracy