Karuna Munde | माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात 2009 पासून वैर होते, असा दावा करूणा मुंडे शर्मा (Karuna Munde Sharma) यांनी केला आहे. तसेच, पंकजा मुंडे यांना मंत्री पद मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे योगदान होते, असेही त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे हे पंतप्रधान पदाच्या उंचीचे नेते असल्याचे त्यांनी कौतुकाने नमूद केले.
वाल्मिक कराडकडे हजारो कोटींची संपत्ती
करूणा मुंडे शर्मा यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, कराड याची स्वतःची कोणतीही लायकी नाही. पूर्वी मुंडे घराण्यात घरकाम करणारा कराड, आज 4 हजार 500 कोटी रुपयांचा मालक कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडेंनी केवळ भाषण द्यायचे आणि बाकी सर्व जबाबदारी कराड सांभाळायचा, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, पुण्यातील एका प्रभावशाली व्यक्तीचे नाव 6 मार्चला जाहीर करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
करूणा मुंडे शर्मा यांनी आरोप केला की, धनंजय मुंडे यांच्या राजकीय प्रवासात दलालांनी अडथळे आणले. त्यांच्यावर राजकीय डावपेच रचून खच्चीकरण करण्यात आले. त्या म्हणाल्या, “मी धनंजय मुंडेंची ताकद होते, पत्नी म्हणून त्यांचे रक्षण करण्याचे काम करत होते, मात्र दलालांनी आम्हा दोघांमध्ये फूट पाडली.”
करूणा मुंडे शर्मा यांनी दावा केला की, धनंजय मुंडे यांची संपूर्ण संपत्ती वाल्मिक कराडसारख्या दलालांच्या नावावर आहे. “जर उद्या मुंडे मंत्री राहिले नाहीत, तर हेच दलाल दुसऱ्या मंत्र्याचा शोध घेतील,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
धनंजय मुंडेंच्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह?
त्यांनी पुढे सांगितले की, धनंजय मुंडे यांनी मोठ्या संघर्षानंतर मंत्री पद मिळवले आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे सक्षम नेतृत्वाची पात्रता नव्हती, मात्र धनंजय मुंडेंमुळेच त्या मंत्री बनू शकल्या, असे त्यांनी स्पष्ट केले. 2009 पासून दोघांमध्ये कटुता असल्याचेही त्यांनी सांगितले.
Title: Karuna Munde Bold Claims on Dhananjay and Pankaja munde