Karuna Sharma | माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आमदारकीवर संकट येऊ शकते, असा दावा करुणा शर्मा (Karuna Sharma ) यांनी केला आहे. त्यांनी मुंडे यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली असून, त्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 एप्रिल रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी दुसऱ्या पत्नीची माहिती शपथपत्रात नोंदवली नव्हती, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप
करुणा शर्मा यांनी मीडियाशी संवाद साधताना धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, मुंडेंनी 200 बुथ कॅप्चर केले होते, मात्र याकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी शपथपत्रात माझे आणि माझ्या मुलांचे नाव नोंदवले नाही, तसेच 2014 पासून त्यांनी आमच्या प्रकरणाचा कुठेही उल्लेख केला नाही, असेही शर्मा म्हणाल्या.
या संदर्भात आता न्यायालयीन लढाई सुरू असून, मुंडे यांच्याविरोधात वॉरंट निघेल आणि त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल, असा दावा त्यांनी केला. त्यांनी यापूर्वी धनंजय मुंडेंचे मंत्रीपद जाणार असे भाकीत केले होते आणि ते खरे ठरले, त्यामुळे आता त्यांची आमदारकीही जाणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचाराविरोधात पीआयएल दाखल करण्याचा इशारा
करुणा शर्मा यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावरही टीका केली. लोकांच्या पैशांचा गैरवापर होत असून, भ्रष्ट नेत्यांना सत्तेतून हाकलले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. त्या लवकरच आपल्या पक्षाच्या वतीने पीआयएल फाईल दाखल करणार आहेत.
याशिवाय, त्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्याशी झालेल्या भेटीविषयी सांगितले. बँक उद्घाटनाच्या वेळी आणि नाथगडावर दर्शनाला जाताना त्यांची खोक्याशी दोनदा भेट झाली होती. त्यांनी खोक्या भाऊ माझ्यासाठी मदतीला आला, याचा अभिमान असल्याचे सांगितले.
Title : Karuna Sharma Bold Prediction on Dhananjay Munde