Karuna Sharma | राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गुन्हेगारी संबंधांचे आरोप सुरू असतानाच, आता करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी “शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला 4-5 वेळा फोन करून बोलावले होते. धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच झाला असता, पण अजित पवार (Ajit Pawar) यांनी काहीतरी केलं आणि शरद पवारांनी मला वेळ दिला नाही,” असा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
“धनंजय मुंडेंचा भ्रष्टाचार, अजित पवार त्यांना वाचवत आहेत”
करूणा शर्मा यांनी आरोप करत सांगितले की, “धनंजय मुंडेंनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे आणि अंजली दमानिया (Anjali Damania) हळूहळू सर्व सत्य बाहेर आणत आहेत. मात्र, अजित पवार सातत्याने त्यांना वाचवत आहेत.”
त्या पुढे म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत 3,000 वंजारी समाजातील लोकांवर खोट्या एफआयआर दाखल केल्या आहेत. सरकार लोकांच्या मतांचा गैरवापर करत आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याने मारहाण केली, तो आता जेलमध्ये सडतोय. धनंजय मुंडेंचीही तीच अवस्था होणार आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
करूणा शर्मा म्हणाल्या, “मस्साजोग प्रकरणात सुप्रिया सुळे (Supriya Sule) जसे लक्ष देत आहेत, तसेच त्यांनी मला मदत करावी. कलेक्टर कार्यालयात वाल्मिक कराडने कलेक्टर आणि मंत्री धनंजय मुंडेंसमोर माझ्यावर हल्ला केला. त्या घटनेची सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करून द्यावीत.”
“अजित पवार माझं काहीही ऐकत नाहीत”
करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी “अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही कारण ते काहीही ऐकत नाहीत. अंजली दमानियांनी सर्व पुरावे दिले, पण अजित पवार यांनी काहीच कारवाई केली नाही,” असे सांगितले. या आरोपांमुळे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावर मोठा दबाव वाढत चालला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि सरकार यावर काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.