Karuna Sharma l बीडच्या गुन्हेगारी जगतात चर्चेत असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर करुणा शर्मा यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला असून, त्यांच्यासोबत घडलेला एक अनुभवही त्यांनी शेअर केला आहे.
करुणा शर्मांनी सांगितला खोक्या भोसलेचा प्रसंग :
करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं की, “मी खोक्या भाऊला ओळखत नाही. मात्र, एकदा एका बँकेच्या उद्घाटनासाठी मला बीडमध्ये बोलावलं गेलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा बीडला गेले होते. आता काही लोक माझे आणि खोक्याचे फोटो व्हायरल करत आहेत, पण त्यात काही तथ्य नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “जेव्हा मी बीडला गेले होते, तेव्हा काही गुंडांनी मला अडवलं होतं आणि गहिणीनाथ गडावर जाण्यास मनाई केली होती. त्याचवेळी खोक्या आला आणि त्याने सांगितलं की, ‘तुम्हाला जायचं असेल, तर तुम्ही जाऊ शकता. मी तुमचा भाऊ म्हणून सोबत आहे.’ मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की, जर वातावरण तणावग्रस्त असेल, तर मला जाण्याची आवश्यकता नाही.”
Karuna Sharma l “माझी खोक्याशी काहीही ओळख नाही” :
करुणा शर्मा यांनी पुढे स्पष्ट केलं की, “माझी खोक्याशी कोणतीही खासगी ओळख नाही. कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही. तुम्ही माझे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासू शकता.” अशा प्रकारे त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्याविषयी होत असलेल्या चर्चांना फेटाळून लावलं.
खोक्या भोसलेच्या अटकेनंतर वनविभागाने त्याचे घर जमीनदोस्त केलं. त्यानंतर रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी घर पेटवून दिल्याची घटना घडली. या संदर्भातही करुणा शर्मा यांनी परखड मत मांडलं. “कोणाचंही घर पाडायला किंवा जाळायला नको. एखाद्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही.”
करुणा शर्मा यांनी अधिक आक्रमक होत प्रशासनावर सवाल उपस्थित केला. “तुम्हाला जर एखाद्याचं घर पाडायचं असेल, तर अशांचे पाडा जे तरुणांना गुन्हेगारीकडे ढकलत आहेत. मग वाल्मिक कराडचं घर का नाही तोडलं?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.