Kedarnath Ropeway l केदारनाथ (Kedarnath) आणि हेमकुंड साहिब (Hemkund Sahib) यात्रेकरूंना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केदारनाथ आणि हेमकुंड रोप-वे योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे यात्रेचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवाशांचा त्रासही कमी होईल.
केदारनाथ रोप-वे: प्रवास आता अवघ्या 36 मिनिटांत पूर्ण :
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम – पर्वतमाला प्रकल्पाअंतर्गत सोनप्रयाग ते केदारनाथ (12.9 किमी) दरम्यान रोपवे उभारला जाणार आहे. सध्या या मार्गासाठी 8 ते 9 तास लागतात, मात्र हा रोपवे सुरू झाल्यानंतर प्रवास फक्त 36 मिनिटांत पूर्ण होईल.
हा ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला (3S) तंत्रज्ञानावर आधारित असणार असून, एकाच वेळी 1,800 प्रवासी प्रवास करू शकतील. या योजनेमुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे.
गोविंदघाट ते हेमकुंड साहिब रोपवे प्रकल्प :
यासोबतच, गोविंदघाट ते हेमकुंड साहिब (12.4 किमी) रोपवे प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. सध्या हा प्रवास 21 किमीचा आणि अत्यंत कठीण चढ असल्याने तो पायी किंवा पालखीतून करावा लागतो. हा रोपवे सुरू झाल्यानंतर प्रवास अधिक सुकर होईल.
या प्रकल्पाची रचना डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) पद्धतीने केली जाणार असून, एकूण 2,730.13 कोटी रुपयांच्या खर्चाने हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.
मात्र या दोन्ही रोपवे प्रकल्पांमुळे यात्रेकरू आणि पर्यटकांना प्रवास अधिक सोयीचा आणि वेगवान होईल. तसेच, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी देखील ही मोठी सुविधा ठरणार आहे.