आईची भेट अपूर्णच राहिली; वळणावर गाडी झाडावर आदळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Kolhapur Accident | कोल्हापूरमध्ये एका तरुणाचा अत्यंत भीषण अपघात झालाय. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट झाडावर जाऊन आदळली.  भीषण अपघातात (Accident) एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अशोक रामू पाटील (वय 35, मूळ रा. गुडेवाडी, ता. चंदगड, सध्या रा. बामणी, ता. कागल) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. (Kolhapur Accident)

अपघाताचा तपशील

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, अशोकच्या पत्नीचे गाव बामणी असून, लग्नानंतर तो पत्नीसोबत बामणी येथेच राहत होता. तेथे तो सासुरवाडीच्या शेतीची देखरेख व इतर कामे करत होता. अशोकची पत्नी सीपीआर हॉस्पिटलमध्ये (CPR Hospital) नोकरीला आहे. आईला भेटण्यासाठी तो अधूनमधून गावाकडे जात असे. सोमवारी रात्री तो एकटाच मोटारीने (एमएच 14, सीके 4197) बामणीहून गडहिंग्लजमार्गे (Gadhinglaj) गुडेवाडीकडे जात होता.

दरम्यान, हरळी बुद्रुकच्या (Harali Budruk) अलीकडील एका वळणावर गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळली. ही धडक इतकी जोरात होती की, गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला. अशोकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि नाकातोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. हरळी ग्रामस्थ आणि प्रवाशांनी त्याला गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) नेले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

आईची भेट राहिली अपूर्ण

अशोकच्या दोन भावांचे यापूर्वीच निधन झाले आहे. गावाकडे आई आणि भावाची मुले राहतात. एक भाऊ कामानिमित्त कोल्हापुरात (Kolhapur) असतो. दिवंगत भावाच्या मुलीचे लग्न 16 फेब्रुवारीला आहे. अशोकला सोमवारी आईने भेटायला बोलावले होते, परंतु वाटेतच त्याच्यावर काळाने घाला घातला, ज्यामुळे त्याची आणि आईची भेट होऊ शकली नाही. अशोकच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि अडीच वर्षांचा मुलगा आहे. (Kolhapur Accident)

Title : Kolhapur Accident Car Crashes into Tree on a Turn Youth Dies on the Spot