Kunal Kamra | कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे त्याच्या एका विडंबनात्मक गाण्यामुळे निर्माण झालेला मोठा वाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर त्याने केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापले असून, आता टी-सीरिज (T-Series) कंपनीने त्याच्या गाण्यावर कॉपीराइट नोटीस बजावली आहे.
कॉपीराइट नोटीसमुळे गाणं ब्लॉक, कामराची संतप्त प्रतिक्रिया
‘दिल तो पागल है’ या गाजलेल्या सिनेमातील गाण्याच्या चालीवर आधारित एका विडंबन गाण्यातून कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. या व्हिडीओवरून शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतल्यानंतर खारमधील हॅबिटॅट स्टुडिओवर कार्यकर्त्यांनी धडक देत तोडफोड केली. या सगळ्या गोंधळानंतर आता टी-सीरिजने गाण्यावर कॉपीराइट स्ट्राइक मारत ते ब्लॉक केलं आहे.
टी-सीरिजच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामराने (Kunal Kamra) मूळ गाण्याचा वापर कोणतीही परवानगी न घेता केला असून, त्यामुळे कॉपीराइट कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कामराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
“टी-सीरिज कठपुतली बनू नये,” कामराचं आवाहन
कुणाल कामराने यावर अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया दिली. त्याने टी-सीरिजवर नाराजी व्यक्त करत लिहिलं, “कृपया कठपुतली बनू नका. विडंबन कायदेशीरदृष्ट्या वाजवी वापरात येतं. मी मूळ लिरिक्स किंवा म्युझिकचा वापर केला नाही. जर माझा व्हिडीओ काढणार असाल, तर मग प्रत्येक कव्हर गाणं, नृत्यही हटवावं लागेल.”
त्याने पुढे चाहत्यांना आवाहन करत लिहिलं, “हा व्हिडीओ हटवण्याआधी कृपया तो डाऊनलोड करून ठेवा.” या ट्वीटमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं असून, काही युजर्स कामराच्या बाजूने उभे आहेत, तर काहींनी यावर टीका केली आहे.
धमक्यांपासून कॉपीराइटपर्यंत, कामराच्या विरोधात वाढलेले संकट
या प्रकरणानंतर कामराला धमक्या मिळाल्याचंही समोर आलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ माजला होता. त्यातच आता कॉपीराइट नोटीसेमुळे त्याच्यावर आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
Title : Kunal Kamra Faces Copyright Heat