Kunal Kamra | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करून वादात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांने अखेर मौन सोडत आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे. माफी मागण्यास स्पष्ट नकार देत त्याने आपल्यावर झालेल्या कारवाईवर सवाल उपस्थित केला आहे. (Kunal Kamra)
“मी लपणारा नाही, मी माफीही मागणार नाही”
कुणाल कामरा (Kunal Kamra) याच्यावर शिंदे गटाने आक्षेप घेतल्यानंतर त्याच्या स्टुडिओवर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर कामराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला. मात्र कामरानी आपल्या चार पानी निवेदनातून हा वाद अधिक तीव्र करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे.
“मी माफी मागणार नाही आणि पलंगाखाली लपून बसणाऱ्यांपैकी नाही. मी जे बोललो, तेच अजित पवार (Ajit Pawar) यांनीही शिंदेंबद्दल (Eknath Shinde) बोललं होतं,” असा स्पष्ट इशारा त्याने दिला. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारीही त्यांने दर्शवली आहे.
“हॅबिटॅट फोडणं म्हणजे…” – कामराची उपरोधिक टीका
कामराने त्याच्या निवेदनात म्हटलं, “हॅबिटॅट हे फक्त एक व्यासपीठ आहे. मी जे बोलतो त्यासाठी ती जागा जबाबदार नाही. माझ्या विनोदावरून त्या जागेवर हल्ला करणं म्हणजे मूर्खपणाचं उदाहरण आहे. बटर चिकन आवडलं नाही म्हणून टोमॅटोचा ट्रक उलटवण्यासारखं आहे.”
तो पुढे म्हणाला की, “बोलण्याचं स्वातंत्र्य फक्त सत्ताधाऱ्यांची स्तुती करण्यासाठी नाही. मोठ्या नेत्यांची थट्टा सहन न होणं, ही माझ्या अभिव्यक्तीच्या हक्काची मर्यादा ठरू शकत नाही.”
My Statement – pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025
सरकारच्या कारवाईवर संताप
“पूर्वसूचना न देता हॅबिटॅटवर महापालिकेचे अधिकारी हातोडा मारून गेले, त्यांच्यावर कारवाई होणार का? की मी कार्यक्रम करतो म्हणून ती शिक्षा?” असं विचारत त्याने प्रशासनाच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
आपला मोबाईल नंबर लीक केल्याने मिळणाऱ्या धमकीच्या कॉलवरही त्यांने उपरोधिक भाष्य करत, “व्हॉईसमेलवर गाणं ऐकून तुम्हाला ते नकोसं वाटतंय, हे आता समजलं असेल,” असा चिमटा काढला. “भारतात पत्रकार स्वातंत्र्य 159 व्या क्रमांकावर आहे – हे लक्षात ठेवा,” असं सांगत त्यांने माध्यमांनाही लक्षवेधी संदेश दिला.
Title : Kunal Kamra Refuses Apology Slams Shinde Group