मराठी भाषेबाबत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…’भाषा लोपल्यास…’

Javed Akhtar

Javed Akhtar l ज्येष्ठ गीतकार आणि पटकथाकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी, मातृभाषेचे महत्त्व विशद करताना, भाषा लोपल्यास संस्कृतीशी असलेला संबंध तुटतो, असे परखड मत व्यक्त केले आहे. ते मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘अभिजात मराठी पुस्तक प्रदर्शना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

मातृभाषेतून संवादाचा आग्रह :

जावेद अख्तर यांनी प्रत्येक आईने आपल्या मुलाशी मातृभाषेत संवाद साधला पाहिजे, यावर भर दिला. “जर आई आणि मुलांमध्ये मातृभाषेतून संवाद झाला नाही, तर मुलांची भाषा आणि पर्यायाने संस्कृतीशी असलेली नाळ तुटून जाईल. ते कुठलेच राहणार नाहीत,” असे ते म्हणाले. भाषा ही आपली ओळख असून, त्यामुळे मातृभाषा येणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षाचे उदाहरण देत ते म्हणाले, “वृक्ष जेवढा मोठा, तेवढीच त्याची मुळे खोलवर रुजलेली असतात. तसेच भाषेचे आहे.”

यावेळी बोलताना त्यांनी, अनेक शतकांपासून मराठी भाषेत उत्तुंग साहित्य निर्मिती झाली असली तरी, ते साहित्य केवळ मराठीपुरतेच मर्यादित राहिले आहे, याकडे लक्ष वेधले. मराठीतील दर्जेदार साहित्य जगभरात पोहोचण्यासाठी त्याचा अनुवाद होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. युरोपमध्ये महिलांनी कविता लिहिल्यावर त्या पुरुषांच्या नावाने प्रसिद्ध कराव्या लागत, त्या काळात महाराष्ट्रात संत मुक्ताबाई, संत जनाबाई, बहिणाबाई यांनी केलेल्या कवितांमुळे त्या सुपरस्टार ठरल्या होत्या, याची आठवण त्यांनी करून दिली.

Javed Akhtar l विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, साहित्य, राजकारण, पत्रकारिता, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी नवरसपूर्ण आणि आशयगर्भित कविता सादर केल्या. उपस्थितांनी काव्यमैफिलीचा आनंद घेतला.

या कार्यक्रमात, प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा सत्कार प्रख्यात गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी केला, तर गीतकार जावेद अख्तर यांचा सत्कार राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘कोण तू रे कोण तू?’ ही कविता सादर केली. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा (Dr. Vijay Darda) यांनी देखील कुसुमाग्रज यांची ‘अखेर कमाई’ आणि स्वतः लिहिलेली ‘अंतिम तारीख’ या कविता सादर केल्या. आशा भोसले यांनी सुरेश भट लिखित ‘केव्हा तरी पहाटे’ ही गझल सादर केली.

News title : Language Loss Severs Cultural Ties: Javed Akhtar

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .