लोकमान्य टिळकांवरही झाला होता बलात्काराचा आरोप!

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे खापर पणतू आणि काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एका वकील महिलेच्या तक्रारीनंतर विश्रामबाग पोलिसात या गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय. या प्रकरणामुळे लोकमान्य टिळकांच्या ‘ताई महाराज’ प्रकरणाची नव्याने चर्चा सुरु झालीय.

ताई महाराज प्रकरण दत्तकविधान आणि संपत्तीसंदर्भात आहे, मात्र या खटल्यात लोकमान्य टिळकांवर बलात्कार केल्याचा आरोपही करण्यात आला होता.

 

नक्की हे प्रकरण काय आहे ‘प्रकरण’ सविस्तर पाहुया…

पुण्यात लोकमान्य टिळकांचे बाबा महाराज पंडित नावाचे एक मित्र राहात होते. मुंबई सरकारमध्ये ते पहिल्या वर्गाचे सरदार होते. पुणे, बेळगाव, सोलापूर जिल्ह्यांमध्ये आणि कोल्हापूर संस्थानात त्यांच्या मालकीच्या मालमत्ता होत्या. गडगंज संपत्ती असलेला या माणसाने पहिल्या पत्नीच्या अकाली मृत्यूनंतर पुण्यातील सिन्नरकर नावाच्या एका पुस्तक विक्रेत्याच्या रुपवान मुलीशी लग्न केलं. त्यांचं नाव सकवारबाई, त्यांनाच ताई महाराज असंही म्हटलं जायचं.

१८९७ मध्ये बाबा महाराज कॉलऱ्यामुळे मृत्यूशय्येवर पडून होते. त्यावेळी लोकमान्य टिळक त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी बाबा महाराजांना मृत्यूपत्र करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ताई महाराज त्यावेळी गरोदर होत्या त्यामुळे त्यांना मुलगा होईल आणि आपल्या संपत्तीला वारस मिळेल, अशी आशा बाबा महाराजांना होती. 

बाबा महाराजांनी टिळकांचा मृत्यूपत्र करण्याचा सल्ला तर ऐकलाच शिवाय त्यांनाच आपल्या मालमत्तेची व्यवस्था पाहण्यासाठी विश्वस्त होण्याची गळ घातली. टिळकांनीही विश्वस्त होण्याचं कबूल केलं. बाबा महाराजांच्या इच्छेनुसार टिळकांप्रमाणेच बाबा महाराजांचे व्याही दादासाहेब ऊर्फ गणेश श्रीकृष्ण खापर्डे, श्रीपाद स‌खाराम कुंभोजकर आणि बळवंत मार्तंड नागपूरकर हे विश्वस्त बनले.

७ ऑगस्ट १८९७ रोजी स‌काळी बाबामहाराजांनी मृत्युपत्र तयार केलं. त्याचा मजकूर टिळकांनीच सांगितला. त्यात म्हटले होते, “आमचे कुटुंब सौ. स‌कवारबाई हल्ली गरोदर आहेत. तिला पुत्र न झाल्यास किंवा पूत्र होऊन तो अल्पायुषी ठरल्यास आमचे घराण्याचे नाव चालवण्याकरिता यथाशास्त्र जरुर लागेल तितक्या वेळेस आमचे कुटुंबाचे मांडीवर दत्तक वर लिहिलेल्या गृहस्थांच्या विचारे देऊन त्या मुलाचे वतीने तो वयात येईपर्यंत स‌दर विश्वस्तांनी स्थावर-जंगम मालमत्तेची व्यवस्था करावी.” मृत्यूपत्र झालं आणि त्याच दिवशी बाबा महाराजांचं निधन झालं.

१८ जानेवारी १८९८ रोजी बाबा महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे ताई महाराजांना मुलगाच झाला. मात्र दुर्देवाची गोष्ट म्हणजे तो अल्पायुषी ठरला. त्यामुळे बाबा महाराजांनी मृत्यूपत्रात नमूद केल्याप्रमाणे ताई महाराजांनी शक्यतो आपल्या नात्यातील मुलास दत्तक घ्यावे, असा विचार पुढे आला.  टिळक आणि अन्य विश्वस्तांनी पंडित घराण्यातील एका लहान मुलास दत्तक घेण्याचं ठरवलं. ताई महाराजांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. हा मुलगा औरंगाबादजवळच्या निघोने गावचा होता. ठरल्याप्रमाणे हा दत्तकविधान सोहळा पार पडला.

दरम्यानच्या काळात काही जणांनी ताई महाराजांचे कान फुंकण्यास सुरूवात केली. हा लहान मुलगा दत्तक घेऊन तुम्हाला काहीही फायदा नाही. कारण तो स‌ज्ञान होईपर्यंत तुमच्या मालमत्तेवर विश्वस्तांचे नियंत्रण राहील. त्यापेक्षा तुम्ही जर पंडित घराण्याच्या कोल्हापूर शाखेतील बाळा महाराज यांना दत्तक घेतले, तर किमान ३० हजाराचे दागिने तुमच्या हाती येतील, असं त्यांना सांगण्यात आलं. ते ऐकून ताई महाराजांनी बाळा महाराजांना दत्तक घेण्याची तयारी सुरू केली. पण टिळकांनी हे दत्तकविधान बेकायदेशीर असल्याचं सांगून ते थोपवण्याचा अटोकाट प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी कोर्टापासून पुण्याच्या तालिमबाज पठ्ठ्यांपर्यंत स‌र्वांची मदत घेतली. पण अखेर हा दत्तकसमांरभ पुण्याऐवजी कोल्हापूरला पार पडला. शाहू महाराजांनी उपस्थिती लावून या दत्तकविधानला आपला पाठिंबा दर्शवला. 

लोकमान्य टिळकांनी या दत्तकविधानाविरोधात २३ स‌प्टेंबर १९०१ रोजी पुण्याच्या प्रथमवर्ग स‌बजज्जांच्या न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला. मात्र खोटी साक्ष देणे, बनावट दस्तऎवज व खोटा पुरावा तयार करून फसवणूक करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे वगैरे गंभीर आरोपांबाबत पोलिस चौकशी करून टिळकांवर खटला भरावा, अशी शिफारस या खटल्यातील न्यायाधीश अस्टनने स‌रकारला केली. त्यानुसार टिळकांवर फौजदारी खटला भरण्यात आला. याप्रकरणी २४ ऑगस्ट १९०३ रोजी टिळकांना दीड वर्षांची स‌क्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली.

न्यायाधीश अस्टन यांच्या निकालाविरोधात लोकमान्य टिळक अपिलात गेले. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याप्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. नंतर दिवाणी खटलाही टिळकांच्याच बाजूने निकाली लागला. ३१ जुलै १९०६ रोजी जव्हेरीलाल ठाकोर या न्यायाधीशाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला. विरोधी पक्षाने त्याविरोधी उच्च न्यायलयात अपिल केलं. उच्च न्यायालयात टिळक हा खटला हरले. मग टिळकांनी प्रीव्ही कौन्सिलमध्ये धाव घेतली आणि तिथं त्यांनी हा खटला जिंकला. 

टिळकांवरील बलात्काराचा आरोप- 

ताई महाराज प्रकरणातील फौजदारी खटल्यात टिळकांविरोधात पुरावा म्हणून एक पत्र सादर करण्यात आलं होतं. औरंगाबाद येथील मुक्कामात टिळकांनी ताई महाराजांवर बलात्कार केला, असा आरोप या पत्रात करण्यात आला होता. खुद्द ताई महाराज आणि त्यांची ब्राह्मण सेविका गोदूबाई यांनी न्यायालयात तसं सुचित करणारी साक्षही दिली होती. 

दरम्यान, टिळक-चरित्रकार तात्यासाहेब केळकर सांगतात, “या जबान्या झाल्या त्या दिवशी कोर्टातून घरी आल्यावर टिळक रागाने लाल झाले होते, की तस‌े लाल झालेले एरवी कोणी केव्हा पाहिले नव्हते. ते इतकेच म्हणाले की, ‘एखादी बाजारबसवी स्त्रीदेखील आपली बेअब्रू आपल्या तोंडाने कबूल करीत नाही, झाकून ठेवते पण एवढ्या मोठ्या स‌रदार घराण्यातील ही स्त्री निष्कारण आपली बेअब्रू आपल्या तोंडाने खोटे बोलून दाखविते तेव्हा तिचा धिक्कार असो.'” (पृ. १५१)

दरम्यान, दिवाणी खटल्यासोबतच फौजदारी खटल्याचा निकालही लोकमान्य टिळकांच्याच बाजूने लागला. त्यामुळे बलात्काराच्या आरोपातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

 

संदर्भ – शाहू छत्रपती आणि लोकमान्य टिळक – य. दि. फडके, श्रीविद्या प्रकाशन, प्रथमावृत्ती, १९८६, पृष्ठ – १०२ ते १३८ आणि १५१

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…