Maharashtra Board l महाराष्ट्र राज्य मंडळाने (Maharashtra State Board) शैक्षणिक वर्षासाठी एकसमान दिनदर्शिका लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये परीक्षा आणि सुट्ट्या एकाच वेळी असतील. पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान होणार असून, १ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर २ मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल.
राज्यातील ९०,००० शाळांवर नवा नियम लागू :
या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे ९०,००० शाळांना नव्या शैक्षणिक वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. शिक्षण विभागाच्या मते, हा निर्णय घेतल्याने शिक्षण व्यवस्थेत समानता आणि सुसूत्रता राहील. कोकणपासून ते विदर्भापर्यंत सर्व शाळांना ही दिनदर्शिका लागू करण्यात येणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) अधिकाऱ्यांनी सांगितले की, या निर्णयाचा मुख्य उद्देश राज्यभरातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याचा आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या तारखांना परीक्षा होण्याऐवजी आता सर्वत्र एकाच वेळेला होणार आहेत, त्यामुळे शैक्षणिक समन्वय साधला जाईल.
Maharashtra Board l शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांची चिंता :
या निर्णयावर काही शाळा व्यवस्थापनांनी चिंता व्यक्त केली आहे. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, २५ एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर लगेचच १ मेपूर्वी निकाल तयार करणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. पेपर तपासणीसाठी पुरेसा वेळ नसल्याने गुणवत्ता नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो, असे त्यांचे मत आहे.
शिक्षण विभागाने मात्र हा निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुसूत्र अभ्यासक्रम, नियोजनबद्ध परीक्षा आणि समान संधी मिळेल, असा सरकारचा दावा आहे.