Maharashtra Government | राज्यातील रोजगार निर्मिती आणि इंधन वितरण व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. रखडलेल्या १६६० पेट्रोल पंपांना परवानगी देण्याबरोबरच आणखी २ हजार नवीन पेट्रोल पंप उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘एक खिडकी योजना’ (Single Window System) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे परवानग्यांची प्रक्रिया जलद आणि सुलभ होणार आहे. (Maharashtra Government)
पेट्रोल पंपांसाठी ‘एक खिडकी योजना’ लागू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महसूल विभागाला पेट्रोल पंप परवानग्यांच्या प्रक्रियेत गतिमानता आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर सरकारने महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य संबंधित विभागांकडून ‘ना हरकत परवानगी’ (NOC) लवकर मिळावी, यासाठी ‘एक खिडकी योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील पेट्रोल पंप उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि अनावश्यक अडथळे दूर होतील. तसेच, पुढील तीन महिन्यांत पेट्रोल पंप सुरू करण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्याचे निर्देश महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.
रोजगार निर्मितीसाठी मोठी संधी
या निर्णयामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. एका अहवालानुसार, यामुळे तब्बल ३० हजारांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. तसेच, लहान उद्योजकांना व्यवसाय वाढवण्याची संधी मिळेल. (Maharashtra Government)
राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे इंधनपुरवठा अधिक सक्षम होईल आणि आर्थिक विकासाला गती मिळेल. त्यामुळे उद्योग क्षेत्र, वाहनचालक आणि सर्वसामान्य नागरिक यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे.
Title : Maharashtra Government to Get 2000 New Petrol Pumps for Employment Boost