Maharashtra l राज्यात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारने घेतला होता. मात्र, या योजनेमुळे एसटी महामंडळ तोट्यात गेल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केला आहे. त्यामुळे यापुढे एसटी प्रवासात कोणत्याही सवलती देण्यात येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीमुळे दररोज 3 कोटींचा तोटा :
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, महिलांना 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवासामुळे एसटी महामंडळ दररोज तब्बल 3 कोटी रुपयांचा तोटा सहन करत आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही प्रवासासाठी सवलत दिली जाणार नाही, असा मोठा निर्णय त्यांनी जाहीर केला.
Maharashtra l महिलांसाठी 50% सवलत योजना आणि त्याचा परिणाम :
राज्यातील मागील सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेची घोषणा केली होती. यामुळे महिला मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करू लागल्या, अशी आकडेवारी सत्ताधारी नेत्यांकडून सादर करण्यात आली होती. मात्र, या योजनेमुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप विरोधक करत होते.
याआधी महायुती सरकारने एसटी तोट्यात गेल्याच्या आरोपांना फेटाळून लावले होते. मात्र, आता परिवहन मंत्र्यांनीच या सवलतींमुळे महामंडळावर आर्थिक बोजा वाढल्याचे कबूल केले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “जर सर्वांसाठी सवलती सुरू ठेवल्या, तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल. त्यामुळे सध्या कोणत्याही नव्या सवलतींचा विचार केला जाणार नाही. गावखेड्यांपर्यंत एसटी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, पण सवलतींना मर्यादा असतील.”
यापुढे एसटी तिकीट दर वाढणार? :
या निर्णयानंतर एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत सरकार कोणते निर्णय घेणार? प्रवासी भाडे वाढणार का? याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे महिलांची 50% सवलत कायम राहील की बंद होईल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.