Death l मृत्यूनंतरचे जग कसे असते यावर आजही अनेक मतमतांतरे आहेत. याबाबत प्रत्येकाची वेगवेगळी धारणा आहे. तसे पाहता, या गोष्टीबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. अशातच, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत ज्याने मृत्यूनंतरचे जग पाहिल्याचा दावा केला आहे. २० मिनिटांसाठी मरून पुन्हा जिवंत झालेल्या या व्यक्तीने एका मुलाखतीत सांगितले की, मृत्यूनंतर तो कुठे गेला होता आणि त्याच्यासोबत काय काय घडले.
६० वर्षीय स्कॉट ड्रमंड जेव्हा २८ वर्षांचे होते तेव्हा त्यांचा एक अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, ज्याचे ऑपरेशनही झाले होते. याच ऑपरेशनदरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले होते, परंतु २० मिनिटांनंतर ते पुन्हा जिवंत झाले. आपला हा अनुभव सांगताना स्कॉट म्हणतात की, “जेव्हा मी मेलो होतो तेव्हा मी एका नर्सला ऑपरेटिंग थिएटरमधून ओरडताना पाहिले होते, ती म्हणत होती ‘मी त्याला मारून टाकले’.” (Death)
“ऑपरेशनदरम्यान मला असे जाणवले की, माझ्या हातात आणि हृदयात काहीतरी जात आहे. मला माझ्या अंगठ्यावर लावला जाणारा प्रत्येक टाका दिसत होता. मी माझ्या जवळ एका व्यक्तीला जाणवू शकत होतो. ते कदाचित देव होते. त्यावेळी नर्सला वाटले की मी मरण पावलो आहे. म्हणून ती रडत रडत ऑपरेटिंग थिएटरमधून बाहेर गेली. त्यानंतर अचानक कोणीतरी मला सुंदर फुले आणि मोठ्या हिरव्यागार गवताच्या मैदानात घेऊन गेले.”
स्कॉट पुढे म्हणतात, “मला आठवते, तेव्हा मी मागे वळून पाहिले नव्हते. कदाचित मला मागे न पाहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर मी एका शेतात पोहोचलो. ती व्यक्ती (देव) अगदी माझ्या शेजारी उभी होती, पण मी त्यांना पाहू शकलो नाही. माझ्या डावीकडे काही मोठी आणि उंच झाडे होती. ती खूपच वेगळी होती. तर दुसऱ्या बाजूला सुंदर रानफुले होती.”
स्कॉट पुढे सांगतात, “जी व्यक्ती मला तिथे घेऊन गेली होती ती आणि माझ्याशिवाय तिथे आणखी कोणीही नव्हते. माझ्या जवळून पांढरे ढग जाऊ लागले. अचानक मला माझ्या जन्मापासून ते त्या क्षणापर्यंतच्या माझ्या संपूर्ण आयुष्याचा व्हिडिओ दिसू लागला. मी माझ्या आयुष्यात केलेली चांगली आणि वाईट कामे मला दिसत होती. जणू काही माझ्या कर्मांचा न्याय होत होता.”
यानंतर त्यांच्या एका मार्गदर्शकाने (गाईड) त्यांना उठून ढगांवर चालण्यास सांगितले. तेही टेलिपॅथीद्वारे! तेव्हा ढगांपासून बनलेला एक मजबूत हात माझ्या दिशेने आला आणि मला म्हणाला की, “अजून तुझी वेळ आलेली नाही. तुला अजून खूप कामे करायची आहेत.” आणि जसा तो हात मागे गेला तसा मी पुन्हा माझ्या शरीरात परत आलो.
स्कॉट म्हणतात की, “मला त्या जागेवरून परत यायचे नव्हते. ती एक अतिशय सुंदर आणि शांत जागा होती. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला हे जाणून आश्चर्य वाटले की मला मरण येऊन २० मिनिटे उलटून गेली होती.”