“स्त्रियांना बॉलिवूडमध्ये कायमच…” , सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईरालाने केला गौप्यस्फोट

Manisha Koirala | नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) हिने आपल्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मनिषाने इंडस्ट्रीतील जवळपास सर्वच सुपरस्टार्ससोबत काम केले आहे. आपल्या कारकिर्दीत तिने अनेक चढउतार पाहिले आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात केल्यानंतर मनिषाने पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये दमदार पुनरागमन केले.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेबसिरीजच्या माध्यमातून तिने 2024 मध्ये पुनरागमन केले आहे. 54 वर्षीय मनिषाने ‘हीरामंडी’ मध्ये साकारलेल्या ‘मल्लिका जान’ या व्यक्तिरेखेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. दरम्यान, आता मनिषाने एका मुलाखतीत सांगितले की तिला इंडस्ट्रीत तिच्या वयामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

बॉलिवूड अभिनेत्रींना अनेकदा वयावरुन टोमणे मारले जातात. नुकतेच, मनिषा कोईराला (Manisha Koirala)  हिने याविषयी एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणते की महिलांना त्यांच्या वाढत्या वयावरुन नेहमीच हिणवले जाते. इंडस्ट्रीत अनेकदा महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते, याविषयी तिने परखडपणे आपले मत मांडले आहे.

महिलांना नेहमीच हिणवले जाते-

‘हीरामंडी’ अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) हिने नुकतीच ‘फ्री प्रेस जर्नल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने इंडस्ट्रीतील 50 वर्षे पूर्ण केलेल्या अभिनेत्रींविषयी आपले मत व्यक्त केले. मनीषा म्हणाली, “इंडस्ट्रीत असो वा इतरत्र, वाढते वय हा महिलांसाठी एक मोठा मुद्दा आहे. महिलांना नेहमीच हिणवले जाते. मी कधीही एखाद्या ट्रोलरला एखाद्या पुरुषाला ‘तो म्हातारा झाला आहे’ असे म्हणताना ऐकले नाही, पण अनेक महिलांना ट्रोल केले जाते. हे वय कमी लेखण्यासारखे आहे. पुरुषंपेक्षा महिलांवर वयाचा अधिक प्रभाव पडतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikram Bawa (@vikram_bawa)

वयामुळे काढून टाकण्यात आलं-

ती पुढे म्हणाली, “मला अनेक राऊंड टेबल कॉन्फरन्समधून फक्त माझ्या वयामुळे काढून टाकण्यात आले आणि सांगण्यात आले की ही कॉन्फरन्स तुमच्यासाठी नाही, तर एका विशिष्ट वयोगटासाठी आहे. आमचा अपमान केला जातो. मी विचारले, ‘ठीक आहे, जर पुरुष कलाकार त्याच वयाचा किंवा त्याहून अधिक वयाचा असेल तर तो चांगले काम करतो का? त्यालाही राऊंड टेबल कॉन्फरन्समधून वेगळे ठेवले जाते का?’ प्रत्यक्षात तसे होत नाही. मी कमीतकमी दोन ते तीन राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये असे पाहिले आहे की, मला फक्त वाढत्या वयामुळे वेगळे ठेवण्यात आले होते. याचा आमच्यावर खूप परिणाम होतो. त्यांना फक्त जास्त वय असलेल्या अभिनेत्रींबाबत आक्षेप आहे.”

ही काय काम करणार?

मनिषा पुढे म्हणाली, “अनेक लोक विचार करतात की ही ‘बुढ्ढी हो गई है’. ही आता काय काम करू शकते? काही लोक विचार करतात की चला हिला आई किंवा बहिणीची भूमिका देऊ. पण महिला दमदार भूमिका साकारू शकतात. माझ्या आधी अनेक अभिनेत्रींनी हे सिद्ध केले आहे आणि मलाही तेच करायचे आहे. माझ्यात अजूनही जोश आणि आग आहे. मला अजूनही खूप काम करण्याची भूक आहे. मला एक कलाकार म्हणून पुढे जायचे आहे. वय हा फक्त एक आकडा आहे आणि तो मला थांबवणार नाही. तो कोणालाही थांबवू नये.”

ती पुढे म्हणाली की, बॉलिवूडमध्ये स्त्रियांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. स्त्रिया या फक्त शोभेच्या बाहुल्या नाहीत तर त्या सक्षम अभिनेत्री आहेत हे सिद्ध करण्याची गरज आहे. अनेक अभिनेत्रींनी हे आधीच सिद्ध केले आहे आणि मलाही त्याच मार्गावर चालायचे आहे.

News Title : Manisha-Koirala-Slams-Trolls-on-Ageism