Prema Sakhardande Death l मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांनी 94व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक मालिका, नाटकं आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या या अनुभवी अभिनेत्रीच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. वयोमानानुसार वाढत्या आजारांमुळे त्यांनी गुरुवारी रात्री 10 वाजता माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
अंत्यसंस्कार शिवाजी पार्क स्मशानभूमीत :
प्रेमा साखरदांडे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. रात्री उशिरा दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीत प्रेमा साखरदांडे यांना ‘प्रेमाताई’ या टोपणनावाने ओळखले जात असे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. अभिनयासोबतच लेखन क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. ‘शालेय रंगभूमी’ हे त्यांचं लिखाण विशेष चर्चेत राहिलं.
Prema Sakhardande Death l अभिनयाची समृद्ध कारकीर्द :
प्रेमा साखरदांडे यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. ‘स्पेशल 26’, ‘द इम्पॉसिबल मर्डर’, ‘मनन’, ‘माझे मन तुझे झाले’, ‘सावित्री बनो’ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यांच्या दमदार अभिनयाने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी समृद्ध झाली आहे.
प्रेमा साखरदांडे यांच्या पश्चात त्यांची कन्या असून, त्यांचे कुटुंब या मोठ्या दुःखातून जात आहे. हिज मास्टर्स व्हॉइस या ध्वनिमुद्रिका बनवणाऱ्या कंपनीत कार्यरत असलेले वसंतराव कामेरकर यांची त्या कन्या होत्या. त्यांच्या 10 भावंडांपैकी त्या एक होत्या.
प्रेमा साखरदांडे यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ कलाकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचा सहजसुंदर अभिनय आणि कसदार संवादफेक प्रेक्षकांना नेहमीच भावली. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.