बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राजस्थानमध्ये आकाशातून पडलेल्या ‘या’ वस्तूची किंमत खरंच करोडो रुपये आहे का?

खगोलविश्व माणसासाठी नेहमीच कुतुहलाचा विषय ठरला आहे. आकाशातील अनेक चित्रविचित्र गोष्टी आपल्याला नेहमीच अचंबित करत असतात. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्ये पहायला मिळाला. चक्क आकाशातून एक वस्तू जमिनीवर येऊन पडली. आता या वस्तूची किंमत तब्बल कोटींच्या घरात असल्याचा दावा केला जातोय.

राजस्थानच्या जालोर भागात अचानक एक मोठा स्फोट झाला. हा आवाज तब्बल २ किमी पर्यंतच्या परिसराला ऐकू गेला. आकाशातून एक वस्तू खाली जमिनीवर आदळली. या वस्तूचा खाली येण्याचा वेग इतका प्रचंड होता की, जमीनीच्या एक फुटाच्या आत ही वस्तू रूतून बसली. आकाशातून पडलेली आणि धातूसारखी दिसणारी ही वस्तू ‘उल्का पिंड’ असल्याचं आता समोर आलं आहे.

आपल्या आकाशगंगेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असणाऱ्या अनेक उल्का असतात. या उल्का खनिजे, धातू, वायू इ. पासून बनतात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत जेव्हा या वस्तू प्रवेश करतात. तेव्हा या जमिनीकडे अत्यंत वेगानं खेचल्या जातात. त्यांना ‘उल्का पिंड’ असं म्हटलं जातं. जालोर भागातील ‘सांचौर चरखी गायत्री काॅलेज’ च्या परिसरात पडलेली वस्तू अशाच स्वरूपाची एक उल्का होती.

उपविभागीय अधिकारी भूपेंद्र यादव यांना या गोष्टीची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी हजर झाले. आकाशातून पडलेली ही धातूसारखी वस्तू त्यांनी ताब्यात घेतली. या वस्तूची तपासणी केल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

धातू तज्ञांकडून या उल्केची तपासणी केली असता, या उल्केचं वजन २ किलो ७८८ ग्रॅम असल्याचं आढळून आलं. एवढंच नव्हे तर या उल्केच्या आत अनेक प्रकारचे मौल्यवान धातूही आढळून आले. प्लेटीनम, नायोबियम, जर्मेनियम, कैडमियम, निकेल यांसारख्या धातूंचा यात समावेश होता.

या उल्केची संगणकीय चाचणी करणारे शैतानसिंग कारोला यांच्या मते, जेव्हा या उल्केची चाचणी केली तेव्हा तीच्या तळाशी अनेक मौल्यवान धातूंचा समावेश असल्याचं आढळून आलं. प्लेटीनम यापैकी सर्वात महाग धातू आहे. बाजारात एक ग्रॅम प्लॅटिनमचा सध्या ६ हजार दर आहे. यानुसार या उल्केत अजून प्लॅटिनम आढळून आलंच तर, या दगडासारख्या दिसत असलेल्या उल्केची किंमत कोटींच्या घरात जाऊ शकते.

आकाशातून जेव्हा ही उल्का जमिनीवर आदळली. तेव्हा तब्बल ३ तास या उल्केला आगीनं वेढा घेतला होता. यामुळे एक फूटाच्या खड्ड्यात ही उल्का खचली गेली. ही उल्का पाहण्यासाठी परिसरातून एकच गर्दी घटनास्थळी पोहचली. या उल्केचा आकार लंबुळता असल्याचं पहायला मिळालं.

आकाशात रात्री अनेक चांदण्या तुटताना आपण पाहत असतो. मात्र हा तारा नसून पृथ्वीवर आदळणाऱ्या उल्का असतात. या उल्कांचा वेग इतका प्रचंड असतो की पृथ्वीवर पोहचण्याआधी त्या जळून खाक होतात. जमीनीवर अगदी क्वचितच ही उल्का आदळत असते. यामुळे राजस्थानमध्ये घडलेली ही घटना नक्कीच दुर्मिळ म्हणावी लागेल.

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More