Jai Gujarat | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात ‘जय गुजरात’ (Jai Gujarat) अशी घोषणा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. विरोधकांनी यावर टीकास्त्र सोडलं होतंच, पण आता या घोषणेवरून सोशल मीडियावर टीका करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कल्याणमधील राजकीय वातावरण तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्ता रोहन पवार (Rohan Pawar) याने सोशल मीडियावर एकनाथ शिंदेंचा (Eknath shinde) फोटो शेअर करत “जय गुजरात” असं कॅप्शन दिलं होतं. यावर स्वप्निल एरंडे यांनी आक्षेप घेत बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रोहन पवार याच्याविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवण्यात आला.
‘जय गुजरात’वरून वाद सुरू, शिंदेंनी दिलं होतं स्पष्टीकरण :
पुण्यात झालेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यात, एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी “जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात” अशी घोषणा दिली होती. या कार्यक्रमात उपस्थित गुजराती बांधवांच्या कार्याचा गौरव करत त्यांनी ही घोषणा केल्याचं सांगितलं होतं.
शिंदेंनी स्पष्ट केलं की, “जय हिंद म्हणजे देशाचा अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे राज्याचा अभिमान, आणि जय गुजरात म्हटले कारण हे उद्योजक गुजराती समाजातून आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला कर्मभूमी मानली आहे.” (Jai Gujarat)
Jai Gujarat | राजकीय वातावरण तापलं, सोशल मीडियावर टीकास्त्र :
दरम्यान, विरोधकांनी या घोषणेवरून शिंदेंवर जोरदार टीका केली होती. ठाकरे गट आणि मनसे दोघांनी यावरून शिंदेंना ‘गुजरातप्रेमी’ ठरवत महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप केला. त्याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्ता रोहन पवार याने सोशल मीडियावर शिंदेंचा फोटो पोस्ट करत डिवचलं होतं.
मात्र आता या पोस्टवरून गुन्हा दाखल झाल्यामुळे सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा म्हणत आहेत, तर काही जण याला राजकीय सूडबुद्धी मानत आहेत.