Ladki Bahin Yojana l मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) अपात्र लाभार्थींची संख्या आणखी वाढणार आहे. राज्यात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर, चालू महिन्यात आणखी चार लाख महिलांची नावे या योजनेतून कमी होणार आहेत. यामुळे, सरकारची मोठी रक्कम वाचणार आहे.
अपात्र लाभार्थींची संख्या ९ लाखांवर :
यापूर्वी ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. आता त्यात आणखी ४ लाखांची भर पडल्याने, एकूण ९ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. यामुळे सुमारे ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महायुती सरकारने (Mahayuti Government) विधानसभा निवडणुकीपूर्वी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी सुमारे २ कोटी ३१ लाख ८६० महिला पात्र ठरल्या होत्या. परंतु, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र महिलांची संख्या वाढली आहे.
Ladki Bahin Yojana l योजनेसाठी नवीन निकष :
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सरकारकडून नवीन निकष लागू करण्यात येणार आहेत. लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत ई-केवायसी (e-KYC) करून हयातीचा दाखला देणे बंधनकारक असेल. १ जून ते १ जुलै या काळात ई-केवायसी करावी लागेल. तसेच, ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे, त्यांना या योजनेतून अपात्र केले जाणार आहे.
लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखांहून अधिक आहे की नाही, हे तपासण्यासाठी सरकार आयकर विभागाची (Income Tax Department) मदत घेणार आहे. नवीन पात्र झालेल्या आणि नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासूनच लाभ दिला जाईल. चारचाकी वाहन असलेल्या, सरकारी नोकरी करणाऱ्या आणि दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येणार आहे.