Maharashtra l सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातून एक हृदयाला हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका मोलमजुरी करणाऱ्या आईने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप बाळाला दगडाला बांधून ठेवलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. आईच्या या कृतीमागे क्रूरता नसून असहायता आणि गरीबीचा आक्रोश आहे.
समाज आणि प्रशासनाला जागं करणारी घटना :
सदर महिला रोजंदारीवर मजुरी करत असून, कामावर असताना आपल्या लहानग्याची काळजी घेणारे कोणीच नसल्यामुळे त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने ही पद्धत अवलंबली.
दरम्यान, ती महिला सांगते की, तिचा मुलगा अजून बोलूही शकत नाही आणि त्याच्यावर कोणताही वैद्यकीय उपचारही झाला नाही. आर्थिक परिस्थिती इतकी हलाखीची आहे की, मुलाला घरात एकटं सोडणं तिच्यासाठीही असह्य झालं होतं.
Maharashtra l नागरिकांमध्ये प्रचंड संताप :
हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि दुःख व्यक्त होत आहे. अनेकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. स्थानिक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी पुढे येऊन या कुटुंबाला मदत करावी, अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे शासनाच्या आणि समाजाच्या जबाबदारीचीही जाणीव करून दिली गेली आहे.
अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे. गरीब आणि असहाय मातांसाठी बालकेंद्र, शासकीय मदत योजना किंवा सामाजिक सुरक्षा कवच तयार करणे काळाची गरज बनली आहे. एक आई आपल्या बाळाला अशा प्रकारे बांधण्याची वेळ येते, यापेक्षा वेदनादायक काहीच असू शकत नाही.