बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सामाजिक स्पर्धा आणि माझी परीक्षा”; MPSC विद्यार्थिनीने लिहिलेला हा वास्तवदर्शी लेख नक्की वाचा!

पुणे | समाजात काहीतरी घडलं की समाजव्यवस्थेचे सगळे घटक जागृत होतात आणि त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतात. याला मी अपवाद नाही. या लेखाचा संदर्भ म्हणजे स्वप्निल लोणकर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणारा हा आमच्यासारखाच विद्यार्थी आज आमच्यामध्ये नाही. सध्या अनेकांनी राजकारणी, मीडिया आणि बऱ्याच लोकांनी याबद्दल प्रतिक्रिया दिल्या, म्हटलं मी या प्रवाहात आहे आणि सध्या तयारी करते तर आपली पण बाजू मांडून बघूया.

आज अनेक बुद्धिवाद्यांनी स्पर्धा परीक्षा या विषयाला घेऊन analysis केले पण खूप कमी लोक हे ”मायाजाळ” इमोशनली जगले. या सगळ्याची सुरुवात होते आपल्या समाजात, जो कोणी आज आपल्या अस्तित्वासाठी, आयडेंटिटीसाठी recognition साठी किंवा कोणत्याही कारणासाठी लढतोय त्याला स्पर्धा परीक्षा आपलं ”अल्टिमेट सोल्युशन” वाटतं. बस एवढं झालं ना की सगळं मिळवलं.

एका सुंदर स्वप्नापासून याची सुरुवात होते. मी कलेक्टर होणार, घराण्याचे नाव मोठं करणार, समाजात मोठा होणार आणि जे काही सगळ्यात मोठं मोठं आहे, ते मला मिळणार .

अधिकार, मानसन्मान आणि कोणाच्या तरी डोक्यावर बसून सत्ता गाजवणार. अशा या सुंदर स्वप्नाला घेऊन हा प्रवासी त्याच्या छोट्या गावापासून मोठ्या प्रवासासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात येतो. त्यावेळेस त्यांचा उत्साह म्हणजे वा वा!

ती एवढीशी खोली, ते सकाळी लवकर उठणं आठ-दहा रूममेट मधलं लवकर तयार होणं, सात वाजता लायब्ररीमध्ये जाण्याची धडपड, रोजचे अभ्यासाचे टार्गेट, अधेमधे घेतलेले चहासाठीचे ब्रेक आणि लवकर परत जागेवर जाऊन बसायची इच्छा. असा हा नवा कोरा अस्पायरेंट एक आइडल जीवन जगतो.

आमचे हे जुने-नवे मोटिवेशनल गुरु, फिलोसोफर, सध्याचे चित्रपट, युट्यूब आणि जो येईल तो हेच सांगतो की स्वप्न पूर्ण करा स्वप्नांमुळे आयुष्याला अर्थ आहे. स्वप्ना शिवाय आयुष्यात काही नाही. आम्ही मनापासून आमची स्वप्न फॉलो करतो मग आम्ही चुकतो कुठे?

पहिले दुसरं वर्ष ही परीक्षा समजून घेण्यात जातात. जे पहिल्यापासून चांगल्या शिक्षण व्यवस्थेत शिकले असतात त्यांना या परीक्षेचे अंडरस्टँडिंग जरा लवकर होतं आणि जे खेड्यापाड्यातून जमेल तसं शिकता आले त्यांना इथे पहिला धक्का बसतो. जे टिकले ते पुढे जातात नाहीतर बरेच विद्यार्थी असे आहेत जे एक दोन वर्षानंतर मार्ग बदलतात.

मात्र जे या प्रवासात टिकू शकले नाही जसे काही पहिली पायरी ( पूर्वपरीक्षा) काही दुसरी पायरी (मुख्य परीक्षा) काही तिसरी पायरी( मुलाखत )काही छोट्या-मोठ्या परीक्षांच्या यश-अपयश यांच्या पायऱ्या चढून आलेले असतात अगदी बारीक सारीक मार्कांनी पोस्ट राहिलेली असते. मग याचं आम्ही स्पष्टीकरण देतो अरे बस यार ! 7 मार्कांनी पोस्ट राहिली…अरे! 5 मार्कांनी मेन्स राहिली….बस 12 मार्कने प्रिलीम उडाली.

हा 7-12 चा खेळ आम्हाला पुढच्या वर्षी घेऊन येतो. बस एवढच ना? अरे कव्हर करू स्ट्रगल कोणाला चुकलं? अजून जोमाने करू यावर्षी…..काय असतं त्यात ….कधीतरी होईल…..काहीतरी होईल आणि यात एक दोन ऑफिसर मित्र मैत्रिणी असतात तेही हे गणित सोपं करतात …..’अरे माझं पण असंच झालं होतं काही नसतं , बस एक वर्ष  अजून …एक पोस्ट आली की सगळं  धुऊन निघतं….

या सगळ्या संवादात त्या अपयशाच्या दोन कानाखाली मारून आम्ही पेटून उठतो. जुन्या पुस्तकांची सावरासावर करतो. टेबल आणि मनावरची सगळी भावनिक धूळ स्वच्छ करतो आणि  पुन:श्च हरि ओम! इतक्या अपयशानंतर लगेच नव्याने उभे राहण्याची इच्छा कशी आणि कुठून येते हा खरं एक रिसर्चचा विषय होऊ शकतो. याच नवीन उमेदीचं फळ काही लोकांना पुढच्या attempt ला मिळतं, तर काहींची ढकलगाडी असते.

आमच्यासाठी वर्ष हा पॅरामिटर लागू होत नाही attempt हा एकच पॅरामिटर लागू होतो. तीन चार वर्षानंतर पहिल्या वर्षाचा उत्साह कमी झालेला असतो. स्वतःच्या अभ्यासाचे दहा-बारा तासाचं गणित कोलमडू लागतं आणि ”ग्रुप डिस्कशन” या अभ्यासाच्या पद्धतीत लोक पदार्पण करतात.

आता वैयक्तिक अभ्यास हा तीन-चार तासाचा, पण चार-पाच तासाचे ते ग्रुप डिस्कशन. या ग्रुप डिस्कशनमध्ये, राहुल गांधीने काय करायला पाहिजे?.. ते बाजरीच्या पिकाला कोणती फवारणी करता येते?…तिथपर्यंत अशा अनेक विषयावर वैचारिक भावनिक अशी चर्चा आणि वेळेचा खर्च होतो. काही विद्यार्थ्यांना यातून फायदा होतो तर काहींना इथे ‘आपण अभ्यास करतोय’ अशा मृगजळाचा भास होतो.

तीन-चार वर्षात हा प्रवास एका मॅच्युअर टप्प्यावर येऊन पोचतो वैचारिक प्रगल्भता, समाजाचा इमोशनल अंडरस्टॅंडिंग, प्रॅक्टिकल माईंड सेट हे सगळं आता समाजव्यवस्थेला भिडण्यासाठी आमच्याकडे तयार  झालेलं असतं. असे कित्येक लोक आहेत ज्यांनी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली नाही तरी दुसऱ्या कोणत्यातरी फील्डमध्ये एक्सेलेंस सिद्ध केला पण याचा सर्वे कधी झाला नाही.याच टप्प्यावर काहींच्या जबाबदाऱ्या बदलतात, काही विद्यार्थी पार्टटाईम टीचिंगमध्ये काही विद्यार्थी स्वतःच्या अभ्यासावरून नोट्स काढून, पुस्तके काढून तर काही काउंसलिंग करून आपलं अर्निंग चालू करतात. येणाऱ्या प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करून ही लढाई सुरू ठेवतात.

हाच तो प्रवासाचा टप्पा आहे तिथे खूप कमी लोकं राहिलेले असतात ज्यांना कोणतीही पोस्ट नाही, म्हणावं तसं यश नाही, मग ते समाजात ”merge” होवून जातात. कुठेतरी काहीतरी धडपड करतात. पण अगदीच त्यांना काही मिळाले नाही, असं नसतं, या कित्येक वर्षाच्या अभ्यासाने त्यांना ज्ञानाने समृद्ध केलेलं असतं काही स्किल सेट तयार झालेले असतात आणि इतरांपेक्षा एक व्यापक दृष्टीकोन आयुष्यासाठी बनलेला असतो. त्या दृष्टीकोनाचा उपयोग त्यांना बऱ्याच ठिकाणी होतो, पण कसा होतो याचाही सर्वे झालेला नाही.

जे या प्रवासातून सिलेक्ट होतात त्यांचा ”राज्याभिषेक” होतो आता हे राजे  आता त्यांचं त्यांचं राज्य सांभाळायला मोकळे. यातले अनेक ऑफिसर्स उत्कृष्ट पद्धतीने काम करतात, असे अनेक ऑफिसर्स आहेत जे आपल्या तयारी मधल्या अनुभवातून शिकून पुढे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत करतात .

पण यात काही असे ऑफिसर्स आहेत ज्यांना स्वतःच्या आयुष्यातला फक्त लाल  दिवा महत्त्वाचा वाटतो. त्यांचे स्टाइलिश राहणं, अधिकाराचा अतिरेक आणि भपकेदार मोटिवेशनमुळे काही पोरं ”भपकेदार स्वप्न” बघतात आणि त्या स्वप्नांसाठी धावणं त्यांना अवघड होतं. या सगळ्या स्पर्धेच्या इकोसिस्टीममध्ये आमच्या भावनांचा अतिरेक होतो मग, आम्ही मेडिटेशन, विपष्यना, अध्यात्म या सगळ्यांना सोबत घेऊन प्रवास करतो .

सगळं वाचतो ,सगळं समजून घेतो पण जेव्हा स्वतःवरती परिस्थिती येते, तेव्हा मात्र आम्ही परीक्षेला अटॅच असतोच. बरं आमचं चुकतं! आयुष्यापेक्षा आम्ही परीक्षा मोठी करतो. मग कोणीतरी आम्हाला समजायला पाहिजे. सरकारने काहीतरी बदल घडवायला पाहिजे, या प्रायव्हेट क्लासेसने पैसा आणि फीच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना खरी परिस्थिती सांगितली पाहिजे, जे आज अधिकारी बनून पुढे गेलेत, त्यांनी मागच्याची जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या सगळ्या सिरीयस विद्यार्थ्यांकडून एक प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा, आमची वर्ष वाया जातात ओझं वाढतं पण खरं याला फक्त आमचा ”हट्ट” जबाबदार आहे का?

मी म्हणते काही प्रमाणात आमचा हट्ट जबाबदार असेलही पण बाकी गोष्टी पण बघा ना!

भारतासारख्या देशात जिथे सरकारी नोकरी डोक्यावर नाचवली जाते. इथे तीनशे-चारशे जागांसाठी दहा-बारा लाख लोक फॉर्म भरतात. ३०० जागा-१२ लाख एप्लीकेशन? बाप रे !!! किती चुकीचा खेळ आहे हा! बरं प्रायव्हेटमध्ये जावं तिकडे भलताच खेळ…. कोण देणार नोकरी आम्हाला? असा प्रश्न विचारला की, काही लोक म्हणतात अरे नोकरी घेणार नाही, नोकरी देणारे बना…बिजनेस करा…

तुमचे सगळे विचार बरोबर असतील पण आम्हाला  तुमच्या विचारात उठणं बसणं कठीण जातंय. बरेच विषय आहेत या स्पर्धा परीक्षेच्या युगात ती वर्ष भराची मेहनत या परीक्षेच्या दोन तासात उतरायची कसरत. इतके वर्ष बाहेर राहून बाहेरच्या मेस खाऊन पोखरलेली तब्येत….. त्या गच्च लायब्ररीमध्ये  पाठीच्या कण्याची बारा तासाची बैठक, प्रत्येक दिवसाची मनाची  भावनांची  शर्यत, घरून आलेला एखादा फोन,महिन्याच्या शेवटी मित्राकडून घेतलेली उधारी,स्वतःकडे काही नसताना दुसऱ्याला करायची मदत, तो वाटाघाटी करून खाणारा मेसचा डबा, ते चहाच्या ब्रेकमधले विषय, मित्र-मैत्रिणींचे रिझल्ट आणि सेलिब्रेशन,टारगेट पूर्ण करण्याची ती मरमर, कितीतरी रात्रीचं ते विचारांचं वादळ आणि एक भयाण शांतता व तो येणारा रिझल्ट चा दिवस…. हुश््श!

मग तरीही आम्ही  हा सगळा खेळ का चालवतो ? कारण असं वाटतं की ही वेळ सुद्धा जाईल आणि एखादा दिवस येईल, जेव्हा आमच्या स्वप्न पूर्ण होईल. ..आम्हालाही यश मिळेल. “Hope and Faith” हे खुप छोटे शब्द आमचं बरच मोठं आयुष्य चालवतात. हे आमचंच नाही, समाजातल्या प्रत्येक घटकाचं आयुष्य चालवतात, आज शेतकरी पेरण्या करतो कारण चांगल्या पावसाच्या आशेत. खूप पाऊस झाला नुकसान झालं तरीही तो परत नव्याने रान उभं करतो. ही राजकारणी मंडळी पाच  वर्ष निवडणुकीसाठी तयारी करतात. जिंकले तर सत्ता आणि हरले तर परत प्रयत्न.

हे “आशा – प्रयत्नांचं” समीकरण सगळ्या जगात चालले  आहे तर यावर फक्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चुकीचं कसे ठरवता येईल? आम्हाला काही नको. सहानुभूती तर अजिबात नको. सरकारला मनापासून विनंती आहे, थोडं लक्ष द्या आमच्याकडे!आम्ही प्रयत्न , यश अपयशला मुळीच घाबरत नाही .पण ही जी प्रक्रिया आहे, तिला सुरळीत करा, जागा काढा, मान्य आहे तुमच्यावर खूप जबाबदारी आहेत, पण वेळोवेळी निर्णयांची अनाउन्समेंट करा .

महाराष्ट्रात सरकारी नोकरीमध्ये उच्चस्तरीय अधिकारी आहेत त्यांनाही विचारलं तर ते सांगतील प्रयत्नांचा तो काळ खूप सुंदर होता आम्ही खूप शिकलो, पण आज हे अधिकारी त्यांच्या कामाच्या  विळख्यात अडकलेत. त्यांनाही आम्ही विनंती करतो की, कधीकाळी तुम्ही स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण झालं .आम्हा  विद्यार्थ्यांना त्यासाठी मदत करा.

सरकारने काही निर्णय घेतले तरी तो निर्णय  अंमल करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे. आमच्यावर मूवी ,सिरीज, डॉक्युमेंटरी ,बातम्या काहीच करू नका, बस काही बदलांची गरज आहे ते बदल REFORM करा.

आज या स्पर्धा परीक्षांचं यश लोक मोठ्या पोस्टवरून ठरवतात, पण असे अनेक विद्यार्थी आहेत. जे या आयुष्याच्या स्पर्धेत एका वेगळ्याच अर्थाने विजयी झालेले  आहेत. स्वप्निलने जे काही केलं ते खूप वाईट आहे. 24 वय हे नाऊमेद होण्याचे नाही ते लढायचं आहे. पण तेवढेच भावनिक आणि नाजूक आहे. स्वप्निलच्या चिठ्ठीतलं एक वाक्य म्हणजे “प्रत्येक दिवसासोबत वाढणारं वय आणि ओझं” हे  आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांकडून हा सांगायचा एक प्रयत्न .

 

थोडक्यात बातम्या – 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More