Narayan Rane | रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते नारायण राणे विरूद्ध ठाकरे गटाचे नेते आणि उमेदवार विनायक राऊत यांच्यात लढत झाली. या लढतीत नारायण राणेंनी विजय मिळवला. त्यानंतर नुकताच नारायण राणेंनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. कोकणातून शिवसेना संपवली असं वक्तव्य राणेंनी केलं. आता सामना या वृत्तपत्रातून नारायण राणेंनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे.
शिवसेनेचा पराभव करणं हे नारायण राणेंना जमणार नाही. शिवसेनेने नारायण राणेंना तीन वेळा धूळ चारली आहे. एखाद्या पराभवाने मागे हटणारी आणि खचणारी शिवसेना नाही, असं म्हणत सामना वृत्तपत्रातून ठाकरे गटाने नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.
सामना वृत्तपत्रातून राणेंवर टीका
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांत भाजपचा पुरता निकाल जनतेने लावला आहे. ‘अब की बार चार सौ पार’ वाल्यांचे नाक महाराष्ट्राने कापले, तर त्यांचे दोन्ही कान उत्तर प्रदेशने व ‘मुंडण’ कार्यक्रम राहुल गांधी यांनी केला. तरीही हे लोक विजयाच्या पिपाण्या वाजवत फिरतात हा विनोद आहे. भाजपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे (Narayan Rane) हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे, अशी टीका सामनातून करण्यात आलीये.
“राणे हे पुन्हा मंत्री झाले नाहीत, ही त्यांची योग्यता”
राणे हे आधीच्या मोदी सरकारात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे मंत्री होते. नव्या रालोआ मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या व त्यातूनच ‘शिवसेना संपली, संपवली’ अशी भाषा बोलू लागले. राणे हे पुन्हा मंत्री झाले नाहीत, ही त्यांची योग्यता. राणे हे कधीकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून त्यांनी पक्ष सोडला. राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, पण खाल्ल्या घरचे वासे मोजावेत तसे त्यांचे वर्तन घडले, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केलीये.
राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये जाताना त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर घाणेरडी टीका केली. खासगीत ते भाजप नेत्यांवरही हवे ते बोलतात. मोदी यांनी त्यांना आता मंत्री केले नाही व खासदार होऊनही बेकारीचे जिणे आल्याने मोदी विरोधाची उबळ बाहेर काढून शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. राणे यांच्याकडे पाहता त्यांची प्रकृती थोडी नाजूक झालेली दिसते. त्यामुळे त्यांना विजयाचे अजीर्ण झाले. असा अजीर्णाचा त्रास राणे यांना यापूर्वी अनेकदा झाला, पण या पोटदुखीवर शिवसेनेनेच जालीम उपाय वेळोवेळी केला, अशी टीका सामनातून करण्यात आलीये.
शिवसेनेने राणे व त्यांच्या टोळय़ांचा कोकणातील दहशतवाद मोडून त्यांचा पराभव केला. राणे यांना शिवसेनेने कोकणातही पाडले व मुंबईतही पराभूत केले. त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणची जनता जाणते. कोकणातील निवडणुका म्हणजे ‘हऱ्या-नाऱ्या’ टोळीकडून रक्ताची होळी व खुनाखुनीचा शिमगाच असे. रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, अंकुश परब, सत्यविजय भिसे यांचे खून ‘पचवून’ बिल्ली आज विजयाचे ‘म्यॅव’ करीत असली तरी या बिल्लीचा खरा इतिहास स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केला आहे, असं सामनामध्ये म्हटलंय.
News Title – Narayan Rane Big Statement To Shivsena After Saamna Edit Criticised
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील ‘या’ जिल्ह्याला यलो अलर्ट; तर इतर जिल्ह्यात कसे असणार वातावरण
ओबीसी समाज एकवटला; 57 लाख बोगस कुणबी नोंदी तातडीने रद्द करा,अन्यथा…
महाराष्ट्रात एनडीएला कमी जागा का मिळाल्या? रामदास आठवलेंनी केला मोठा दावा
…म्हणून महाविकास आघाडीला यश मिळाले; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण
आज या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात सावधानता बाळगावी