Pune Metro l निगडी (Nigdi) येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापासून ते चिंचवडच्या (Chinchwad) मदर तेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोच्या (Metro) मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठी रात्रीदेखील खोदकाम केले जात होते, ज्यासाठी अवजड ड्रिल मशीनचा वापर केला जात होता. यातून निर्माण होणाऱ्या प्रचंड कर्कश आवाजामुळे, सध्या परीक्षांचा काळ असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले होते. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर, अखेर मेट्रोने रात्री १० वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत खोदकाम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्रीच्या खोदकामामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय :
सद्य:स्थितीत दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. रात्रीच्या वेळी विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, मेट्रोच्या कामामुळे कर्कश आवाज येतो. त्यामुळे रात्रीच्या वेळेत काम बंद ठेवण्याची मागणी केली गेली होती. अखेर महामेट्रोने (Maha Metro) परीक्षा होईपर्यंत रात्री खोदकामाचे काम बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Pune Metro l रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत खोदकाम बंद
परीक्षेचा काळ सुरू असल्याने, रात्री दहा ते सकाळी सात या वेळेत काम बंद न ठेवल्यास निगडीतील टिळक चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या कामाचा परिसरातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अखेर मेट्रोला जाग आली असून, त्यांनी रात्रीच्या वेळी काम बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे भाजप (BJP) शहर चिटणीस, सचिन काळभोर (Sachin Kalbhor) यांनी सांगितले.