Chhaava Tax Free l पुण्यातील (Pune) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (College of Engineering) होस्टेल मैदानावर ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ‘छावा’ (Chhava) चित्रपटाला राज्यात करमाफी देता येणार नाही, कारण २०१७ मध्येच राज्याने कायमस्वरूपी करमणूक कर रद्द केला आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj) इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.
महाराष्ट्रात करमणूक कर नाही :
फडणवीस यांनी सांगितले की, इतर राज्यांमध्ये चित्रपट ‘टॅक्स फ्री’ (tax free) करण्याचा अर्थ, तेथील सरकार करमणूक कर माफ करते. पण, महाराष्ट्रात करमणूक कर २०१७ सालीच रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे, ‘छावा’ चित्रपटाला वेगळी करमाफी देता येणार नाही.
इतिहासाने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अन्याय केला, असे सांगून ते पुढे म्हणाले की, “देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था” अशा शब्दांत ज्यांचे वर्णन केले जाते, अशा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपट बनल्याचा आनंद आहे.
राज्यकारभार छत्रपतींच्या शिकवणीनुसार :
फडणवीस पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) आम्हाला आत्माभिमान आणि आत्मतेज दिले. त्यांनी समतेचा संदेश दिला. अठरा पगड जातींना एकत्र करून स्वराज्य स्थापन केले.” ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार, वनसंवर्धन, जलसंवर्धन, करप्रणाली, सुरक्षा आणि समुद्री सुरक्षा यांबाबत दिलेली शिकवण आजही महत्त्वाची आहे. “आम्ही त्यांचे मावळे म्हणूनच काम करत आहोत,” असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, दोघेही पुण्यात आले होते, पण त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते निघून गेले. “एखाद्या कार्यक्रमाला आम्ही सोबत नसलो, तरी लगेच चर्चा करण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.