गुजरात निवडणूक- एका मराठी ‘कॅमेरामन’च्या नजरेतून…

गुजरातमध्ये सध्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. सर्व माध्यमांचे पत्रकार सध्या या निवडणुकीचं वेगवान कव्हरेज करत आहेत. ग्राऊंड रिअॅलिटी मांडण्याचा अनेकांचा प्रयत्न आहे, मात्र ‘थोडक्यात‘नं पत्रकाराच्या नव्हे तर ‘कॅमेरामन‘च्या नजरेतून गुजरातमधली परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. इंडिया टीव्हीचे कॅमेरामन ओमकार मंगल गिरी यांनी गुजरातची ग्राऊंड रिअॅलिटी मांडण्याचा केलेला हा पहिला प्रयत्न-

पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलच्या मी आत्तापर्यंत चार-पाच सभा कव्हर केल्या आहेत. त्याच्या सभा जिथं होत आहेत तिथं काॅंग्रेस आणि भाजपा लांब-लांब पर्यंत कधीही पोहोचलेले नाहीत. गुजरातचा विकास हा फक्त अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांपुरताच मर्यादित राहिलाय. गुजरातच्या गावांमध्ये गेल्यावरच हे वास्तव कळतं. अहमदाबादपासून फक्त ७०-८० कि.मी जरी आत गावांमध्ये गेलो तरी खरी परिस्थिती निदर्शनास येते. तिथं नेमकी कशाची गरज आहे, हे हार्दिकला चांगलं माहिती आहे. त्याला फरफेक्ट नस सापडली असं म्हणावं लागेल…

हार्दिकच्या मी कव्हर केलेल्या सभा अशा ठिकाणी झाल्यात, ज्या गावांमध्ये पोहोचायला धड रस्ताही नाही. मग ते मोरबी असो, खाकरीया असो, सिरॅमिक फॅक्टरीतल्या मजदुरांना जाऊन भेटणं असो किंवा तिथल्या गावांमधला नेमका मुद्दा उचलणं असो… काॅंग्रेस आणि भाजपला पांढरी कपडे घालून इथं पोहोचणं शक्यच नाही इतके खराब रस्ते आणि तशीच वाहतूक व्यवस्था इथं आहे. अशा ठिकाणांपर्यंत फक्त हार्दिकच पोहोचलाय. हार्दिकच्या या प्रचाराचा फायदा सरळ सरळ काँग्रेसला होणार आहे, भाजपचं पहायला गेलं तर त्यांचे या गावात फक्त पोस्टर पोहोचलेत.

हार्दिकला हे सगळं का जमतंय? तर त्याला लोकांच्या अगदी बेसिक अडचणी माहीत आहेत. तो आत्ता कुठे उभारीला येतोय आणि त्यामुळेच तरुण-तरुणी असतील किंना म्हातारी माणसं असतील यांना त्याच्यापर्यंत पोहचणं अगदी सहज शक्य आहे. राहुल गांधी, काॅंग्रेसचे नेते किंवा नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांविषयी अलं होत नाही. त्यांना भेटायचं म्हणजे आधी सेक्युरिटीचे दोन फटके पडतात, कारण सेफ्टी आणि प्रोटोकाॅल पहिला असतो. त्यामुळे भाषण ठोकतात आणि हे नेते निघून जातात. लोक आपले मावा मळत फक्त नेत्यांच्या गाड्या आणि धुरळा बघत बसतात.

लोकांना आपल्या अडचणी आणि व्यथा थेट हार्दिकपर्यंत पोहोचवता येतात. कारण हार्दिकचा थेट अॅक्सेस त्यांना आहे. त्याला कोणीही भेटतं, त्याची गळाभेट घेतं. हार्दिकभोवतालच्या अशा वातावरणानं कार्यकर्तेही खूश होतात. मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हार्दिकला वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आलीय. असं करुन भाजपने एकाच दगडात दोन पक्षी मारलेत असं म्हणता येऊ शकतं. पहिलं तर हार्दिकच्या जिवाला काही धोका झाला तर ती भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकते आणि दुसरं म्हणजे त्याच्या हालचालींवर नजर ठेवणं सोपं जातं. याला भाजपचा मास्टर स्ट्रोक असंही म्हणता येऊ शकतं. 

अजून एक आतली गोष्ट आहे. पाटीदार आंदोलनामुळे एवढे कांड झालेत गुजरातमध्ये आणि आत्तापर्यंत मोदींनी हार्दिकचं नाव सुद्धा घेतलेलं नाही. त्यांना माहिती आहे की देशद्रोहाचा खटला टाकून आपण आधीच त्याला मोठं केलं. त्यात त्याचं नाव घेऊन त्याचं आणखी महत्त्व वाढवायला नको. हार्दिक ग्रामीण भागात पोहोचलाय, आपला बडाप्रधान हार्दिकचं नाव घेतो म्हणजे हार्दिक खुप मोठी हस्ती आहे, असा मेसेज लोकांमध्ये जाऊ नये याची खबरदारी ते घेत असावेत. 

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या निवडणुकांमध्ये जीएसटी, नोटबंदी, हिंदुत्व, राम मंदीर असे विषय सोडले तर तिसरं काहीच बोलत नाहीत. सभांबाबत बोलायचं झालं तर राहुल गांधी दिवसभरात किमान चार सभा घेतात. चार सभांमध्ये ते तेच तेच पुन्हा-पुन्हा बोलत राहतात. नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात नोटबंदी बोलतात. राहुल गांधी तर ज्या गावात नेटवर्क नाही अशा गावात संसदेतल्या अधिवेशनावर बोलतात. अधिवेशन पुढं का ढकलंल हे समजावून सांगतात आणि हे सगळं लोकांच्या डोक्यावरुन जातं. मोदींना नेमकं कुठं काऊंटर करावं हे राहुल गांधींना अद्याप कळत नसावं.

इकडचे मुख्यमंत्री तर भारीच आहेत, आम्ही 24 तास पाणी कसं पुरवतो? ते हेच पुराण सांगत असतात. त्यांचे मुद्दे पाहिले की कळत नाही रुपाणी साहेब नगरपालिका लढवत आहेत की राज्याची निवडणूक? इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत? हे कोणीही नीट समजून घेताना दिसत नाही. 

हार्दिक या नेत्यांना अपवाद म्हणावा लागेल. तो कपाशीला भाव कसा मिळेल? शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांवर सबसीडी कशी वाढवून मिळेल? यासोबतच त्याचा मुख्य आरक्षणाचा मुद्दा तसेच हाॅस्पिटल्स असतील, गावातल्या शाळा शाळा असतील किंवा सिरॅमिक उद्योगातल्या कामगारांच्या अडचणी असतील, हार्दिक तिथल्या प्रत्येकांची अडचण त्यांच्याजवळ जाऊन समजून घेतो. हार्दिकचा हा प्लसपॉईंट म्हणावा लागेल. तो जर असाच जमिनीवर राहिला तर गुजरातला मोठा राजकीय चेहरा मिळू शकतो…