Nagpur News | नागपूर जिल्ह्यातील वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. काही दिवसांपासून पेट्रोल पंपांवर थांबवण्यात आलेले फोनपे, गुगल पे, पेटीएम, डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे होणारे ऑनलाइन पेमेंट व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.
प्रशासनाच्या सूचनेनंतर निर्णय अखेर मागे :
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सायबर फसवणुकीच्या (Cyber fraud) घटनांमुळे ही सेवा तात्पुरती बंद केली होती. मात्र ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन आणि प्रशासनाच्या सूचनेनंतर हा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे.
डीलर्स असोसिएशननुसार, काही पंपचालकांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आणि लाखो रुपयांची रोकड गोठवल्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे परवानगीशिवाय व्यवहार बंद करण्यात आले होते. पण यामुळे नागरिकांना रोख रक्कम बाळगावी लागत होती, आणि मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
Nagpur News | डिजिटल व्यवहार पुन्हा सुरू; ग्राहकांना होणार फायदा :
कोविडनंतर नागपूरसह (Nagpur) देशभरात डिजिटल व्यवहारांची प्रमाणात वाढ झाली आहे. पेट्रोल पंपांवर (Petrol Pump) दररोज हजारो ग्राहक याच माध्यमातून पेमेंट करत असतात. अशा परिस्थितीत डिजिटल व्यवहार थांबल्याने ग्राहकही नाराज होते. त्यामुळे सामाजिक जबाबदारी स्वीकारत असोसिएशनने पुन्हा पेमेंट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ग्राहक कोणतीही अॅप्स – PhonePe, Google Pay, Paytm – यांचा वापर करून पेट्रोलसाठी सहज आणि सुरक्षित पेमेंट करू शकतील. यामुळे रोख व्यवहारातील अडचणी कमी होतील आणि डिजिटल सेवेचा लाभ ग्राहकांना पूर्ववत मिळेल.